Join us

‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा

By संतोष आंधळे | Published: September 21, 2024 4:29 AM

खासगी रुग्णालयातील सूट रूमप्रमाणे या नर्सिंग होमची रचना करण्यात आली असून त्याला आता कॉर्पोरेट रूप देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे नर्सिंग होम रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे.

संतोष आंधळे

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागातील १८० वर्षांपेक्षा जुन्या जे. जे. रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार दिले जात असले तरी ज्या रुग्णांची खर्च करण्याची तयारी असते. या अशा रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयात नर्सिंग होम आहे. आता या नर्सिंग होमच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. खासगी रुग्णालयातील सूट रूमप्रमाणे या नर्सिंग होमची रचना करण्यात आली असून त्याला आता कॉर्पोरेट रूप देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे नर्सिंग होम रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे.

शासनाच्या नियमानुसार पहिल्या सात दिवसांसाठी ८०० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक दिवसासाठी २००० रुपये या दराने शुल्क आकारले जाते. मात्र, ज्या पद्धतीने हे नर्सिंग होम तयार करण्यात आले आहे त्यानुसार काही प्रमाणात हे शुल्क वाढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जे.जे. रुग्णालयातील सर्वच स्तरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. ज्या रुग्णांना खर्च परवडतो त्या रुग्णांना नर्सिंग होम पर्याय असतो. नर्सिंग होमच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांत ते रुग्णांच्या सेवेत येणार आहे. जे.जे. रुग्णालयातील काही वॉर्डस्सुद्धा खासगी रुग्णालयाप्रमाणे करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच रुग्णांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. 

- हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग.

nया खोल्यांना खासगी रुग्णालयात २० ते २५ हजार भाडे दिवसाला आकारले जाते.

nत्यामुळे शासकीय शुल्कात थोडे-अधिक पैसे वाढविले तरी फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.  

नवीन नर्सिंग होममधील सुविधा?

nजे. जे. रुग्णालयातील नर्सिंग हे तिसऱ्या मजल्यावर असून त्या ठिकणी १२ खोल्या आहेत. नूतनीकरणानंतर या नर्सिंग होमला आधुनिक रूप देण्यात आले आहे.

nप्रत्येक खोलीत रुग्णांसाठी अत्याधुनिक बेड्स, त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था, फ्रिज, टीव्ही, एअर कंडिशन, इंटरकॉम फोन, नर्सिंग स्टाफला बोलाविण्यासाठी बेल, रुग्णाच्या नातेवाइकांना राहण्यासाठी स्वतंत्र बेड, टॉयलेट आणि गिझर बाथरूम व्यवस्था करण्यात आलेली आहे.