जे. जे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कामगार उद्या जाणार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:38+5:302021-05-16T04:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चतुर्थ श्रेणी वर्गात कंत्राटी पदभरती करू नये, सरळ सेवा भरती करत कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चतुर्थ श्रेणी वर्गात कंत्राटी पदभरती करू नये, सरळ सेवा भरती करत कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी जे. जे. रुग्णालयातील ९०० चतुर्थ श्रेणी कर्मचारी साेमवारपासून कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयातील राज्य शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमधील मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी कामगार भरती करण्यात आली; पण जे. जे. रुग्णालयात कंत्राटी पद्धतीला जोरदार विरोध करण्यात आला आहे. येथील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीनेच भरा. त्यातही आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्या, अशी मागणी आमची आहे, असे राणे यांनी सांगितले. या मागणीसाठी आम्ही सर्व स्तरावर पाठपुरावा करत आहोत. काही दिवसांपूर्वी वरिष्ठांनी बैठक घेऊन ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले; पण पुढे काहीच केले नाही. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून कामबंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काेरोना परिस्थितीचे भान आहे, तर नॉनकोविड रुग्णांचीही काळजी आहे. त्यामुळेच सोमवारपासून कामबंद आंदोलन करत असल्याचे आधीच प्रशासनाला कळवले आहे. त्यांनी तोपर्यंत ठोस पावले उचलावीत, अन्यथा पुढे जे काही होईल त्याला संघटना जबाबदार नसेल, असे संघटनेने सांगितले.
..............................................................