जे. जे. रुग्णालयात जमा होतोय महसूल; ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:38 AM2023-07-09T06:38:13+5:302023-07-09T06:38:29+5:30
क्लिनिकल ट्रायल प्रकरण : गेल्या पाच वर्षे सुरू असलेल्या या क्लिनिकल ट्रायलप्रकरणी जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनाने समिती नेमली आहे
मुंबई - जे. जे. रुग्णालयात रुग्णांवर करण्यात येणारी क्लिनिकल ट्रायल हा विषय वादात सापडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीचे सदस्य या विषयाशी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांत जेजे रुग्णालयाच्या देणगी समितीच्या खात्यात ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ३० जून रोजी 'लोकमत'मध्ये जे. जे. चा महसूल कसा वसूल करणार? या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये चौकशी समिती जे. जे. चा बुडविलेल्या महसूलप्रकरणी शोध घेणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली.
संबंधित डॉक्टरांनी गेल्या पाच वर्षांत किती ट्रायल केल्या. तसेच रुग्णालयांची जागा वापरल्याप्रकरणी रुग्णालयाचे भाडे १२ लाख रुपये तसेच ज्या काही क्लिनिकल ट्रायल करण्यात आल्या त्याच्याकरिता ४१ लाख रुपये रुग्णालयाच्या देणगी समितीच्या कक्षात जमा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजूनही यापेक्षा अधिक रक्कम जमा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. क्लिनिकल ट्रायल किंवा कॉर्पोरेट कंपनीच्या सीएसआरमधून मिळणारा फंड हा देणगी समितीच्या खात्यात जमा केला जातो. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या सूचनेवरून तो योग्य त्या कारणाकरिता खर्च केला जातो.
गेल्या पाच वर्षे सुरू असलेल्या या क्लिनिकल ट्रायलप्रकरणी जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनाने समिती नेमली आहे. त्यामध्ये डॉ. अमिता जोशी यांच्या अध्यक्षेतेखाली ही समिती काम करणार असून, त्यामध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. संजय सुरासे यांचा समावेश आहे. या समितीचा प्राथमिक अहवाल काही दिवसांत येणार असला तरी या विषयांची पाळंमुळं खोलवर असल्यामुळे अंतिम अहवाल येण्यासाठी आठवडाभराची वाट पाहावी लागणार आहे.
जे. जे. रुग्णालयातील वादात सापडलेल्या क्लिनिकल ट्रायलप्रकरणी जी कुणी खासगी संस्थेतील माणसे येथे कार्यरत होती. त्याचा शोध घेण्याचा सध्या प्रयत्न सुरु आहे. ज्या ठिकाणी ट्रायल सुरु होती त्या ठिकाणच्या खोल्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये किती संस्था आणि जे. जे. रुग्णालयातील काही डॉक्टर सहभागी आहेत का, याची माहिती गोळा केली जात आहे. कारण, पाच वर्षांपासून क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत आणि त्याची फार कमी प्रमाणात माहिती रुग्णालय प्रशासनाकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत असून येत्या काही दिवसांत ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे.