५ जणांना अटक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जे. जे. रुग्णालयाजवळील ५ मेडिकलमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या नावाने शस्त्रक्रियेसाठी बनावट टाके विकण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. संबंधित मेडिकलमध्ये पाेलिसांनी मंगळवारी छापा टाकून ५ जणांना अटक केली.
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जे. जे. रुग्णालय परिसरात अशाप्रकारे बनावट टाके विक्री होत असल्याबाबत जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विजय पवार यांनी तक्रार दिली. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत श्री पारस मेडिकल स्टोअर्सचा राज कांतीलाल गोसर (२७), मेट्रो मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचा मोहम्मद आगा (२८), उमामा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचा विनीत वेलाम (२६), शाह मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचा किरण शेलार (२५) आणि मोनार्च इंटरप्राईजेसचा नीलेश चिमनलाल शाह (४८) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून ७६५ टाके जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत ३ लाख ८८ हजार २५४ रुपये आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अटक आरोपींविरुद्ध कॉपीराइटचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी जे. जे. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
.......................................