Join us  

जे. जे. ला लवकरच अभिमतचा दर्जा, अखेर राज्य कला विद्यापीठासाठीची समिती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 7:20 AM

राज्य विद्यापीठाऐवजी अभिमत विद्यापीठाच्या दर्जासाठी २५०० माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली होती. मात्र, आता समिती रद्द केल्याने पुन्हा एकदा सर जे. जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : सर जे. जे. कला महाविद्यालयासह उपयोजित कला महाविद्यालय, वास्तूकला महाविद्यालयाचे (जे. जे.) रूपांतर राज्याचे कला विद्यापीठ करण्यासाठी समिती स्थापन झाली होती. मात्र, ही समिती शासनाने रद्द केली आहे. राज्य विद्यापीठाऐवजी अभिमत विद्यापीठाच्या दर्जासाठी २५०० माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली होती. मात्र, आता समिती रद्द केल्याने पुन्हा एकदा सर जे. जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समृद्ध वारसा लाभलेल्या सर जे. जे. कला महाविद्यालयासह उपयोजित कला व वास्तूकला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासाठी २०१७ पासून प्रयत्न करण्यात येत होते. आयोगाच्या तज्ज्ञ समितीपुढे दोन वेळा सादरीकरण, कागदपत्रांची छाननी, त्रुटींची पूर्तता असे सर्व सोपस्कार झाल्यानंतर अखेरीस आयोगाने या संस्थेला अनन्य स्वायत्त दर्जासह (डी नोव्हो) अभिमत विद्यापीठ सुरू करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली.

संस्थेचा इतिहास, परंपरा, कामगिरीचा विचार करून ही मंजुरी देण्यात आली. याबाबतचे इरादापत्र (लेटर ऑफ इन्टेन्ट) २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोगाने राज्य सरकारला पाठवले. तांत्रिक बाबी आणि आयोगाने घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी तीन वर्षांची मुदतही देण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्याने या संस्थेचे रूपांतर राज्य विद्यापीठात करण्याचा घाट घातला होता. यामुळे जे. जे. तील काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभिमत विद्यापीठाच्या मागणीसाठी सरकारला साकडे घेतले होते.

अभ्यासक्रमाची निर्मिती करावी लागेल जे. जे. महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून, शासकीय जमिनीवर उभारण्यात आले आहे. त्यामुळे अभिमत दर्जा मिळण्यासाठी संस्थेची इमारत वा तत्सम स्थावर मालमत्ता ट्रस्टच्या नावे करावी लागेल. नावात आनुषंगिक बदल करावे लागतील. तसेच प्राध्यापकांची भरती, पायाभूत सुविधा व अभ्यासक्रमाची निर्मिती करावी लागणार आहे.

टॅग्स :मुंबई