जे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:44 AM2019-01-24T00:44:38+5:302019-01-24T00:45:02+5:30
वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा आर्थिक भार पेलणे अशक्य असणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ब-याचदा विविध संस्था, व्यक्तींच्या भेटीगाठी घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत बराच काळ निघून जातो.
मुंबई : वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा आर्थिक भार पेलणे अशक्य असणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ब-याचदा विविध संस्था, व्यक्तींच्या भेटीगाठी घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत बराच काळ निघून जातो. ही प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासंदर्भात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जे. जे. रुग्णालयात नुकताच समाज सेवा विभाग सुरू करण्यात आला आहे. विविध सामाजिक संस्था, व्यक्तींचे सहकार्य लाभलेल्या या विभागामुळे गरजू रुग्णांसाठी मदतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाºया रुग्णांना आर्थिक मदत आणि समुपदेशन करण्यासाठी समाज सेवा विभाग कार्यरत असेल. रुग्ण संवाद वाढविण्यासाठी या विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. या विभागात सामाजिक संस्था, काही कंपन्या यांच्या माध्यमातून निधी प्राप्त करून रुग्णांना मदत करण्यात येईल. या विभागाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले की, या विभागाच्या माध्यमातून सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना जोडण्यात येईल. जेणेकरून गरजू, गरीब रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधोपचाराच्या खर्चाचा भार हलका करण्यासाठी मदत होऊ शकेल.