जे.जे. सुपर स्पेशालिटी ऑगस्टमध्ये रुग्णांच्या सेवेत; चारपैकी दोन विंग कार्यान्वित होणार
By संतोष आंधळे | Published: March 10, 2024 07:40 AM2024-03-10T07:40:31+5:302024-03-10T07:42:28+5:30
रुग्णालयाचे महत्त्वाचे सर्व विभाग या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत.
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर जे.जे. रुग्णालय परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बहुप्रतीक्षित काम जुलै महिन्यात पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये ते रुग्णसेवेत रुजू होणार आहे. सुपर स्पेशालिटीचे चारपैकी किमान दोन विभाग कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा असून त्यानुसार रुग्णालयाचे महत्त्वाचे सर्व विभाग या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधकामाची मुदत गेल्या वर्षी जुलै महिन्यात संपली. त्यानंतर कंत्राटदाराने मुदत वाढवून घेतली. वस्तुत: २०२० मध्ये सुरू झालेले हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कंत्राटदाराने ए, बी, सी आणि डी या विभागांपैकी पहिल्या दोन विभागांचे काम जुलैच्या अखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बांधकाम पूर्ण झालेल्या दोन विभागांचे कामकाज ऑगस्टमध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराने जुलै महिन्यात दोन विंग काम पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली असली तरी त्याच्या कामाचा वेग पाहता काम इतक्या लवकर होईल याबाबत आम्ही साशंक आहोत. तरीसुद्धा विभागामार्फत काम लवकरात लवकर कसे पूर्ण केले जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
असे असेल सुपर स्पेशालिटी रुग्णालय
दोन मजली तळघरासह तळमजला अधिक दहा मजल्यांची इमारत, प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटांचा
रुग्णालयाच्या इमारतीत हृदय शस्त्रक्रिया विभाग, न्यूरो सर्जरी विभाग, हेमॅटॉलॉजी विभाग, रुमॅटॉलॉजी विभाग, किडनी विकार विभाग, एंडोक्रायनोलॉजी विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, अत्याधुनिक व्हीआयपी वॉर्ड तसेच वैद्यकीय विभागात नवीन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, वॉर्ड उभारण्यात येईल.
सध्या जे.जे. रुग्णालयांची १,३५० खाटांची संख्या असून नव्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अजून एक हजार खाटा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाच्या खाटांची संख्या २,३५० होणार आहे.
जे. जे. रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाचा दर महिन्याला आढावा घेत आहोत. कंत्राटदाराने सांगितले आहे पहिल्या दोन विंगचे काम हे जुलैच्या अखेरीस पूर्ण करून देणार आहोत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही विभागांचे काम त्या ठिकणी सुरु करण्यात येईल. या रुग्णालयातील आरोग्य सेवेचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. - हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग.