लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जे. जे. रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांची अखेर छत्रपती संभाजीनगरला बदली झाली आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून त्यांच्याविरोधात सामूहिक रजेवर गेलेल्या २१ डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. शासनाने याची गंभीर दखल घेऊन डॉ. कुरा यांची छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वचाविकार विभागात प्राध्यापक पदावर बदली केली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि त्वचाविकार विभागातील संपकरी डॉक्टर यांच्यात मंगळवारी बैठक झाली. मात्र, त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवले होते. या आंदोलनाला सर्व निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविला होता. विविध आरोप असलेल्या डॉ. कुरा यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आणि ससून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा समावेश आहे. या प्रकरणी आठवडाभरापूर्वी चौकशी समितीने त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सादर केला होता. त्यानंतर शासनाने डॉ. कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. डॉ. महेंद्र कुरा यांना संपर्क केल्यावर त्यांनी या विषयावर आता मला काही बोलायचे नसल्याचे सांगितले.
निवासी डॉक्टरांनी संपावर जायला नको होते: मुश्रीफ
या प्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्वचाविकार विभागातील निवासी डॉक्टरांशी मंगळवारी मी चर्चा केली होती. त्यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कारवाई करताना काही नियम असतात. ती फाईल रीतसर सादर केली जाते. उपसचिवांकडून, प्रधान सचिव त्यानंतर मी आणि त्यानंतर मुख्यमंत्री अशा पद्धतीने फाईलचा प्रवास होतो. मग योग्य ती कार्यवाही होते. या प्रक्रियेला काही दिवसांचा अवधी लागतो. रुग्णालये ही रुग्णांसाठी आहेत. त्यांचे हाल होता कामा नये. निवासी डॉक्टरांना मी आश्वासन दिले होते, त्यांनी अशा पद्धतीने संपावर जायला नको होते असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.