अनिरु द्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : मुंबईच्या जे. जे. रुग्णालय प्रशासनाने कॉट आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देऊन, तलासरीतील गंभीर जखमीला परत पाठवल्याची घटना सोमवारी घडली. वेवजी येथील सोनारपाड्यात राहणाऱ्या दशरथ दिवाल कानल असे या युवकाचे नाव आहे. दशरथ पॉवरटिलरने जमिनीची नांगरणी करीत असताना, १५ जून रोजी अपघात घडून त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर, नातेवाईकांनी त्याला तत्काळ गुजरातमधील वापीच्या हरिया रुग्णालयात दाखल केले. तेथे पायाला प्लास्टर करून प्लॅस्टिक सर्जरी आणि पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला देऊन १७ जून रोजी रजा देण्यात आली. सोमवारी पहाटे रुग्णवाहिकेतून त्याला जे. जे. रुग्णालयात नातेवाईक घेऊन गेले. मात्र, हे उपचार गुरुवारीच केले जातात. शिवाय कॉट उपलब्ध नसल्याचे कारण देऊन, त्याला रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिला. तीन दिवसांनी पुन्हा रुग्णवाहिका करून मुंबई गाठणे परिस्थितीमुळे शक्य नसल्याचे नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले, पण काहीच उपयोग न झाल्याने नाइलाजास्तव नातेवाईकांना पुन्हा परतावे लागले.डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार पास्कल धनारे यांनी आपण यात लक्ष घालू, असे आश्वासन ‘लोकमत’शी बोलताना दिले.
जे. जे. रुग्णालयात आदिवासी रुग्णाला उपचार मिळेना!
By admin | Published: June 20, 2017 2:31 AM