जे. जे.चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही कागदावरच; तीन वर्षांत फक्त २५ टक्केच काम; वैद्यकीय शिक्षणमंत्री निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 07:36 AM2023-08-10T07:36:47+5:302023-08-10T07:36:57+5:30
गेली अनेक वर्ष जे जे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सूर्य करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची मुदत जुलै महिन्यात संपली असून आतापर्यंत फक्त २५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ज्या कंपनीला रुग्णालय बांधण्याचे काम देण्यात आले होते, त्या कंपनी संबंधात पुढे काय करायचे याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बांधकामाचे कंत्राट सुमारे ७०० कोटी रुपयांचे असून या स्थितीमुळे नागरिकांना या नवीन रुग्णालयाचा लाभ मिळण्याकरिता अजून दोन वर्षांची वाट पाहावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेली अनेक वर्ष जे जे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सूर्य करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. मात्र, अद्यापही फारसे काम रुग्णालयाचे न झाल्याने हे काम कधी पूर्ण होणार यांची चर्चा सध्या रुग्णालयात परिसरात ऐकायला मिळत आहे. एका खासगी कंत्राटदाराला हे काम जुलै २०२० मध्ये देण्यात आले. त्याने हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करून देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना दिलेली कामाची मुदत संपली आहे. मे महिन्यात वैद्यकीय शिक्षण आयुक्त्त राजीव निवतकर यांनी स्वतः जे जे रुग्णालयाला भेट देऊन या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली होती.
सध्या जे. जे. रुग्णालयांची १३५० खाटांची संख्या असून नव्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अजून १००० खाटा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या खाटांची संख्या २३५० होणार आहे. यामुळे सुपरस्पेशालिटी शाखेच्या जागा वाढू शकतात. नवीन विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यास येऊन याचा फायदा नागरिकांना होईल. राज्यभरातून रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात.
ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. त्यांनी ते काम ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात अपेक्षित होते. त्यांची बांधकाम करून करण्याची मुदत जुलै महिन्यात उलटून गेली आहे. मात्र, अद्याप केवळ २५ टक्के हे काम झाले आहे. यासंदर्भात मंत्रिमहोदयांना माहिती देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ते स्वतः याबाबत बैठक घेणार आहेत. कंत्राटदारांनी कोरोनाची पहिली आणि दुसऱ्या लाटेत काम करण्यास अडचणी आल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे खडक फोडताना मोठ्या अडचणींना सामोरे गेल्याची कारणे दिली आहेत.
- रणजीत शिंगाडे,
उपविभागीय अभियंता (सिव्हिल), जे. जे. रुग्णालय
या संदर्भातील निर्णय मंत्रालयीन स्तरावर घेण्यात येणार असून, आम्हाला ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू.
-राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग
असे असेल सुपर स्पेशालिटी रुग्णालय
दोन मजली तळघरासह तळमजला अधिक दहा माळ्यांची इमारत
प्रत्येक माळा एक लाख चौरस फुटांचा
रुग्णालयाच्या इमारतीत हृदयशस्त्रक्रिया विभाग, न्यूरो सर्जरी विभाग, हेमॅटॉलॉजी विभाग, रुमॅटॉलॉजी विभाग, किडनी विकार विभाग, एंडोक्रायनोलॉजी विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, अत्याधुनिक व्हीआयपी वॉर्ड तसेच वैद्यकीय विभागात नवीन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, वॉर्ड उभारण्यात येईल