मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई' कार्यक्रमांतर्गत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी सांस्कृतिक जडणघडणीसाठी योगदान देणाऱ्या विभूतींच्या अर्धाकृती पुतळयाचे लोकार्पण करण्यात आले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विचारातून 'हिरोज ऑफ मुंबई' कार्यक्रमाची संकल्पना साकारली गेली आहे.
या अंतर्गत गिरगावातील किलाचंद उद्यानाला एका स्मृती आणि स्फूर्तीस्थळात रूपांतरित करण्यात आले आहे. येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह मुंबईच्या उन्नतीसाठी योगदान देणार्य १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांची निर्मिती केली गेली. या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची प्रेरणा मुंबईकरांना अविरत मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सोबतच या उपक्रमांतर्गत किरचंद गार्डन येथे पर्यावरण पूरक विकास साधण्याच्या प्रयत्नातून सूर्यमंडपम उभारण्यात आले, ज्याद्वारे उद्यानासाठी आवश्यक वीजपुरवठा सोलर उपकरण्याच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. त्याशिवाय नागरिकांसाठी या उद्यानाचे सुशोभिकरण देखील करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरगावात सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर यांच्यासहीत अन्य महापुरुषांचे वंशज देखील उपस्थित होते.
मुंबईला आपल्या कार्यातून भारतातच नाही, तर संपूर्ण विश्वात गौरव प्राप्त करून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांना स्मरण्यासाठी या उद्यानाची निर्मिती केल्याबद्दल जे. पी नड्डा यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन केले. प्रसंगी बोलताना ते म्हणाले "मनाला प्रफुल्लित करेल, अशा वातावरणासह मनाला प्रज्वलित करेल अशी ऊर्जा या उद्यानात आहे. पुढील पिढीला या गोष्टीची जाणीव व्हायला हवी की आजचे उज्वल भविष्य साकारण्यासाठी महान विभूतींनी काय योगदान दिले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून आजच्या तरूणांना आपल्या इतिहासाची ओळख होईल आणि आपल्या देशाबद्दल त्यांचा अभिमान वृद्धिंगत होईल"
मुंबईकरांना स्फूर्ती देणारे प्रेरणा स्थळ उभारल्याबाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन केले. तसेच हे उद्यान उभारण्यासाठी लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केल्याबद्दल मंजू लोढा यांचे देखील अभिनंदन केले. हे ठिकाण येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना चेतना आणि उमेद देईल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्याने आम्ही या उद्यानाची निर्मिती केली. येणाऱ्या काळात हे उद्यान हजारो पर्यटकांचे आकर्षण नक्कीच बनेल, पण त्यासोबतच लाखो भारतीयांना प्रेरणा देणारा एक स्रोत म्हणून ओळखले जाईल." मुंबईच्या प्रगतीमध्ये येथील मूळच्या कोळी बांधवांचे योगदान ओळखून त्यांच्यासाठी देखील येथे पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण केले गेले. त्यांची नावे खालीलप्रमाणे.
१. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर २. स्वा. सावरकर ३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ४. लता मंगेशकर ५. दादासाहेब फाळके ६. कुसुमाग्रज ७. होमी भाभा ८. जेआरडी टाटा ९. जगन्नाथ शंकर शेठ १०. अण्णाभाऊ साठे ११. बाळासाहेब ठाकरे १२. धीरूभाई अंबानी १३. रामनाथ गोयंका १४. सेठ मोती शाह १५. हुतात्मा बाबू गेणू १६. अशोक कुमार जैन १७. कोळीबांधव १८. सचिन तेंडुलकर