लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवणाऱ्या मुंबई मॉडेलचे कौतुक जागतिक स्तरावर झाले. आता संयुक्त अमेरिकेच्या अर्थात काँग्रेस ऑफ युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्’चे सदस्य जे. लुईस कोरिया यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून महापालिकेच्या कामगिरीची दखल घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मात्र धारावी पॅटर्न, मुंबई मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य विभाग, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, निती आयोग यांनी कौतुक केले आहे. नुकतेच जे. लुईस कोरिया यांनी पाठविलेल्या पत्रात कोविड साथरोगाच्या कालावधीदरम्यान मुंबई महापालिकेने केलेली विविधस्तरीय कामे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आहे.
जे. लुईस कोरिया यांनी आपल्या पत्रात, प्रामुख्याने विभागस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याद्वारे गरजू रुग्णांना रुग्णालयातील खाटांचे वितरण संगणकीय प्रणालीद्वारे करणे, प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार व संसर्गाच्या प्रभावानुसार रग्णालयात दाखल करून उपचार करणे, गरजू रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी व्यवस्थापन करणे इत्यादी बाबींचा आवर्जून उल्लेख केला आहे.
व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक....
महापालिकेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार यामुळे एप्रिल महिन्यात ३० टक्के बाधित दर आता चार टक्क्यांवर आला आहे. मुंबई महापालिकेने राबविलेल्या विविधस्तरीय बाबी या व्यवस्थापन कौशल्याचे अत्युत्कृष्ट उदाहरण असल्याचा गौरव कोरिया यांनी केला आहे. चहल यांचे कार्य हे प्रशासकीय सेवेतील कनिष्ठ सहकाऱ्यांसाठी अनुकरणीय असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.