Join us  

जाेर‘धार’, जबरदस्त! अतिवृष्टीच्या विविध दुर्घटनांमध्ये सात जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 8:46 AM

अतिवृष्टीने झोडपले, विविध दुर्घटनांमध्ये सात जण दगावले; अनेक गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

मुंबई : राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनने बुधवारी चांगलाच जोर धरला असून विदर्भ, मराठवाड्यासह कोकणाला अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून निम्म्या राज्यात ‘पाणीच पाणी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी पुराने अंकुरलेली पिके खरडून निघाली. कोकणातही अतिवृष्टीने गावात पुराचे पाणी शिरले. विविध दुर्घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पश्चिम विदर्भातील चौघांचा समावेश आहे. 

बुधवारी दिवसभर राज्यात धुवाधार पाऊस बरसल्यानंतर पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य भारतात काही भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. २० आणि २१ जुलै हे दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. 

कोकण, पश्चिम महाराष्ट्र : जोरधारा पालघरमधील आठ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मुंबई-ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले. कोल्हापूरमधील ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रत्नागिरीमध्येही जगबुडी, गडनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वरमध्ये पुराचे पाणी भरले. सिंधुदुर्गमध्ये तेरेखोल नदीच्या पुरामुळे बांदा शहरातील अनेक भागांना पुराचा वेढा आहे. २४ तासांत महाबळेश्वरला २३१ आणि नवजाला तब्बल ३०७ मिलिमीटर पाऊस झाला. 

विदर्भ : थैमान, पिके खरडली  वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला असून यवतमाळमधील ३ मोठ्या प्रकल्पात ४५.७६% पाणीसाठा उपलब्ध झाला. बुलढाण्यात चार तालुक्यात अतिवृष्टी, हातणूर धरणाचे ३० दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. वाशिममध्ये उमा नदीच्या पुरामुळे ५०० हेक्टर तर अकोल्यातील तीन तालुक्यात १४ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान असल्याचा अंदाज आहे.  

मराठवाडा : ४७ मंडळांत अतिवृष्टी  दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद, लातूरवगळता उर्वरित जिल्ह्यांतील ४७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. एकाच दिवसात सहा जिल्ह्यांतील मंडळात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ टक्के पाऊस झाला आहे. नांदेडमधील २१ मंडळात अतिवृष्टी; पिकांना जीवदान आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. हिंगोलीतील १० मंडळांमध्ये अतिवृष्टी.

यंत्रणांनी सज्ज राहावे : शिंदेराज्यातील मुसळधार पावसामुळे सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आपत्तीच्या स्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी  प्रशासनाला दिल्या. पावसामुळे विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाजही लवकर संपवले.

सज्जता ठेवा : फडणवीसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सर्व विभागीय आयुक्तांशी संवाद साधून आढावा घेतला. अधिक पाऊस आहे, तेथे एनडीआरएफ, एसडीआरएफ चमू सज्ज ठेवाव्या, असे निर्देश दिले. मानवी चुकीमुळे शेतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना दिल्या. 

कुठे शाळांना सुट्टी? कोकणातील पूरस्थिती व येणाऱ्या तीन दिवसांतील पावसाच्या शक्यतेमुळे २० जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शासनाने सुट्टी जाहीर केली.

आज अनेक गाड्या रद्दगुरुवारी पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द. सीएसएमटी-पुणे इंटर्नसिटी, सीएसएमटी-पुणे डेक्कन आणि सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसही रद्द. 

कुठे दुर्घटना? n अमरावती : मोरगड (ता. चिखलदरा) येथे वीज पडून शेतकरी व शेतमजूर ठार. n बुलढाणा : मामूलवाडी (ता. नांदुरा) येथे भिंत कोसळल्याने वृद्धाचा मृत्यू.n वाशिम : मंगरूळपीर येथे प्रवासी निवारा कोसळून एकाचा मृत्यू. n ठाणे : ठाकुर्ली कल्याण रेल्वे मार्गावर ४ महिन्यांचे बाळ पालकांकडून नाल्यात पडून वाहून गेले. भिवंडीत नाल्यात पडून १४ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यूn पालघर : झाड पडून दुचाकीचा अपघात १ ठारn मुंबई : पोयसर नदीच्या पुरात तरुण वाहून गेला.

टॅग्स :पाऊसमुंबईविदर्भ