ग्रंथदिंडीतून होणार मराठी संस्कृतीचा जागर
By admin | Published: February 1, 2017 03:58 AM2017-02-01T03:58:03+5:302017-02-01T03:58:03+5:30
शहरात ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी काढण्यात येणाऱ्या ग्रंथ दिंडीत जवळपास १५ हजार मराठी आणि मराठीवर प्रेम करणारे
- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
शहरात ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी काढण्यात येणाऱ्या ग्रंथ दिंडीत जवळपास १५ हजार मराठी आणि मराठीवर प्रेम करणारे अन्य भाषिकही सहभागी होणार आहेत. लेझिम, ढोलताशे, चित्ररथ, घोडेस्वार, वारकरी, भजनी मंडळी, बुलेटस्वार आणि पारंपरिक वेशभूषेतील मंडळी या दिंडीचे प्रमुख आकर्षण असतील. या ग्रंथदिंडीची जय्यत तयारी झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
गणेश मंदिर येथून सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. ती सकाळी १० वाजता फडके रोड, बाजीप्रभू चौक, चार रस्तामार्गे क्रीडासंकुलातील पु. भा. भावे साहित्य नगरीपर्यंत (संमेलनस्थळ) जाईल. कल्याण, डोंबिवली, काटई, निळजे परिसरातील एकूण ६० शाळा दिंडीत सहभागी होणार आहेत. त्यातील ४० शाळांची लेझिम पथके दिंडीत ताल धरतील. ओमकार व सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांची बॅण्ड पथके आहेत. २० शाळांचे चित्ररथ त्यात असतील. विविध साहित्यिकांच्या साहित्य कृती त्यात मांडण्यात येणार आहेत. साहित्यिकांच्या वेशभूषा विद्यार्थी परिधान करतील. तसेच त्यांच्या हातात साहित्यितील वेचक ब्रीदवाक्यांचे फलक असतील. प्रत्येक शाळेला विषय देण्यात आला आहे. एका शाळेने श्यामच्या आईची प्रतिकृती तयार केली आहे. संमेलनाचा चित्ररथ वाचन संस्कृतीवर आधारित आहेत. चित्ररथात ज्ञानोबा व तुकारामांचे अभंग, गाथा, ज्ञानेश्वरी यांचे दर्शन घडेल. त्यांच्या गाथेतील ओव्या चित्ररथांवर चित्तारलेल्या आहेत. रायडर्स क्लबचे ५० जण बुलेटवर स्वार होतील.
५० भजनी मंडळांचे सदस्य, ५०० वारकरी दिंडीत हरिनामाचा जयघोष करणार आहेत. गुजराती, तामीळ, तेलगू, कानडी भाषिकही दिंडीत सहभागी होतील. संस्कार भारतीतर्फे चौकाचौकांत रांगोळी काढली जाणार आहे. सहा घोडेस्वार असतील, असे प्रवीण दुधे यांनी सांगितले.
ग्रंथ दिंडीचे नियोजन पाहणारे अच्युत कऱ्हाडकर यांनी सांगितले की, संमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून १० रुपयांचे शुल्क घेतले जाणार नाही.
संमेलन लक्षात राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक देण्याचा प्रस्तावही बापगळल्याने दिंडीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक मिळणार नाही.
महानुभव अनुयायांचा सहभाग
वारकरी पंथाप्रमाणेच लिळाचरित्रकार चक्रधर स्वामी हे महानुभव पंथाचे होते. त्यांच्यापासून मराठीची भाषेचे संदर्भ सापडतात. या महानुभाव पंथी व त्यांचे स्वामी दिंडीत सहभागी होणार आहेत.