मुंबई : विद्यार्थ्यांना संतपरंपरेचा लाभ घेता यावा आणि संत साहित्यात रुची निर्माण व्हावी यासाठी नालंदा नृत्य कला महाविद्यालयाने संतगाथा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख आणि महाविद्यालयाच्या संचालिका कनक रेळे, प्राचार्या उमा रेळे हे मान्यवर उपस्थित होते. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.नालंदा कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील संतांची शिकवण आपल्या नृत्याच्या माध्यमातून सादर केली. त्यात सर्व जनसमुदायास एकसमान मानणारे संत कबीर, गणिकेची मुलगी असूनसुद्धा कृष्णावर अविरत प्रेम करून त्याच्यासाठी अभंग म्हणणारी संत कान्होपात्रा, कृष्णाच्या प्रेमामध्ये लीन असणारी संत मीराबाई, राम नामाचे खरे पावित्र्य समजावून सांगणारे संत तुलसीदास, आयुष्याचा खरा अर्थ सागणारे संत रहीम यांच्या साहित्यावर आधारित नृत्यांचा समावेश होता.नालंदा नृत्य कला महाविद्यालयामधील विद्यार्थी केवळ नृत्य नव्हे, तर आपल्या आयुष्यालादेखील एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत आहेत. नालंदासारखी महाविद्यालये निर्माण होणे गरजेचे आहे. नृत्याच्या माध्यमाने संतगाथा तरुण पिढीपर्यंत पोहोचविता येणे शक्य आहे हे या कार्यक्रमामधून दिसून आल्याचे मत विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी या वेळी व्यक्त केले. भारतीय नृत्यशैलीच्या विविधतेत संतपरंपरा आणि साहित्याचा विद्यार्थ्यांनी केलेला जागर कौतुकास्पद असल्याचे कनक रेळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नृत्यकलेतून ‘संतगाथे’चा जागर
By admin | Published: October 09, 2016 4:00 AM