जागर ‘आदिशक्ती’चा़ , दांडियात सेल्फीची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:59 AM2017-09-25T00:59:35+5:302017-09-25T00:59:52+5:30
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतील मुंबादेवी, काळबादेवी, शीतलादेवी, गोलफादेवी, जाखादेवी तसेच देवींच्या अन्य मंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागली आहे.
मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतील मुंबादेवी, काळबादेवी, शीतलादेवी, गोलफादेवी, जाखादेवी तसेच देवींच्या अन्य मंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागली आहे. मुंबईकरांना तर कामातून वेळ काढून या देवींच्या दर्शनासाठी जाणे, फारच अवघड असते. मात्र, वीकेन्डची संधी साधून, मुंबईकरांनी शहरातील ‘शक्तिपीठां’ना आवर्जून गर्दी केली. सार्वजनिक मंडळांनी देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असून, तेथेही दर्शनासाठी व सजावट पाहण्यासाठी भक्तांची गर्दी आहे.
दुष्टांचा संहार करणाºया आदिमाया, आदिशक्तीचा जागर करणारा नवरात्रीचा सण आहे. या सणात नऊ दिवस अखंड आदिशक्तीची आराधना केली जाते. या आदिमायेची अनेक रूपे अनेक ठिकाणी वसलेली आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत या आदिमायेची अनेक मंदिरे आहेत. रविवारी ललित पंचमीनिमित्त मोठ्या प्रमाणावर महिलावर्गाने देवींच्या ओट्या भरण्यासाठी मंदिरात हजेरी लावली.
मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातही नवरात्रीचा उत्सव जोरदार सुरू असून, २८ सप्टेंबर रोजी अश्विन शुद्ध अष्टमीला चंडी हवनास रात्री ८ वाजता प्रारंभ होऊन, पूर्णाहुती रात्री १० वाजता व त्यानंतर आरती संपन्न होईल. ३० सप्टेंबर रोजी विजया दशमी असून, नवरात्रीतील इतर दिवशी आरती पहाटे ५.३० वाजता, संध्याकाळी ६.३० वाजता धुपारती व ७.३० वाजता मोठी आरती होईल. हे सर्व धार्मिक कार्यक्रम, मंदिराचे मुख्य पुजारी बाळकृष्ण रामचंद्र कापडी, सुयोग कुलकर्णी, अरुण वीरकर, केतन सोहनी, रमाकांत भोळे, महेश काजरेकर, बाळकृष्ण मुंडले, आशिष द्विवेदी यांच्यासह २४ पुजाºयांच्या मार्गदर्शनाखाली होतील.
तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र असणाºया दांडियालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रंगबिरंगी चनिया-चोली, लहेंगा अन्य पारंपरिक वस्त्रे परिधान केलेले तरुण-तरुणी दांडियात रंग भरत आहेत. गुजराती, मराठी गाणी तसेच उडत्या चालीच्या हिंदी गीतांच्या तालावर तरुणांचे पाय थिरकत आहेत. यंदा यामध्ये सेल्फीची भर पडली आहे. दांडिया खेळायला आलेली तरुणाई सेल्फी काढताना दिसत असून, कोणी वैयक्तिक तर कोणी ग्रुप सेल्फी काढत आहे.
नवरंगांची उधळण
नवरात्रोत्सवादरम्यान नवरंगांची होणारी उधळण विशेष उल्लेखनीय असते. त्यात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होऊन, रोजच्या रोज विविध रंगांचे पेहेराव परिधान करतात. घरातल्या गृहिणीपासून ते गेल्या काही वर्षांत अगदी कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत रंगसंगती फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. त्यात केवळ तरुणी नव्हे, तर तरुणांचाही मोठा सहभाग आहे.