मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यातील करारा बाणा आणि त्यांचा दरारा सगळ्यांना परिचीत आहे. त्यामुळेच, राज ठाकरेंच्या बोलण्या, चालण्याची आणि भाषणाची नेहमीच चर्चा असते. त्यांच्या वागण्यातही एक रुबाब दिसून येतो. डॅशिंग राज ठाकरेंच्या सुपुत्राची विनम्रता लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२२ या सोहळ्यात दिसून आली. लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२२ चा रंगतदार सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात अमित ठाकरे बॉलिवूडचे दादा जॅकी श्रॉप यांच्या पाया पडल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, जग्गूदादाही काहीवेळ भारावले होते.
लोकमतच्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना लोकमतकडून यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्कारानं गौरवण्यात आले. लोकमत समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
सोहळ्यात अमित ठाकरेंच्या कृतीने उपस्थितांचं लक्ष वेधलं. आई शर्मिला ठाकरे यांच्यासमवेत अमित ठाकरे या सोहळ्यात होते, तितक्यात जॅकी श्रॉफ आले आणि ते एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. त्यावेळी, अमित ठाकरेंनी जग्गूदादाच्या पायाला हात लावून नमस्कार केला. या क्षणाला जॅकी श्रॉफ यांनाही अवघडल्यासारखं वाटलं. त्यांनी अमित यांच्या हाताला पकडून पाठीवर थाप दिली. अमित ठाकरेंची विनम्रता पाहून उपस्थितही भारावले. हा सगळा प्रसंग अमित यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे कौतुकाने पाहत होत्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून राजपुत्राची विनम्रता पाहून अनेकजण आवाक झाले.
लोकमतचे मानले आभार
अमित ठाकरे यांनी लोकमतचा मोस्ट स्टायलीश अवॉर्ड स्वीकारल्यानंतर लोकमतचे धन्यवाद मानले. अमित ठाकरे म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे. मी मराठीत बोलतो. मला ४ दिवसापूर्वी हा पुरस्कार मला देत असल्याचं कळवण्यात आले. तेव्हा माझ्या मनात पहिला हा विचार आला की, नॉमिनीज कोण आहेत? असे कोण स्टायलिश पॉलिटिशन्स आहेत ज्यांच्यातून मला निवडून हा पुरस्कार देण्यात आला. पण इथे आल्यावर कळालं नॉमिनीज नाहीत. या पुरस्काराबद्दल मी लोकमतचे आभारी आहे असं त्यांनी सांगितले.
मला अजून शिकायचंय
मी नुकताच राजकारणात आलो आहे. २ वर्षापासून काम करतोय. मला अजून खूप शिकायचं, फिरायचं आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा आहे. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, मुंबई लोकमत संपादक अतुल कुलकर्णी यांच्या प्रेमापोटी मी पुरस्कार स्वीकारला. मी लोकमतचे आभार मानतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं. तुमच्यात अन् वडील राज ठाकरेंमध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारताच अमित ठाकरेंनी My Style is Better असं दिलखुलास उत्तर देत उपस्थितांची दाद मिळवली.