काँग्रेसचे पेट्रोलपंपांवर 'जागो मुंबईकर जागो' आंदोलन; पेट्रोलियम उत्पादने GST मध्ये आणा - संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 08:37 PM2017-09-15T20:37:37+5:302017-09-15T20:38:02+5:30

मुंबईकरांचे पाकीट कापण्यासाठी राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढविण्यात आले आहेत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. 

'Jago Mumbaikar Jago' movement on Congress's petrol pump; Put Petroleum Products in GST - Sanjay Nirupam | काँग्रेसचे पेट्रोलपंपांवर 'जागो मुंबईकर जागो' आंदोलन; पेट्रोलियम उत्पादने GST मध्ये आणा - संजय निरुपम

काँग्रेसचे पेट्रोलपंपांवर 'जागो मुंबईकर जागो' आंदोलन; पेट्रोलियम उत्पादने GST मध्ये आणा - संजय निरुपम

Next

मुंबई, दि. 15 - मुंबईकरांचे पाकीट कापण्यासाठी राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढविण्यात आले आहेत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. 
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ७९.५४ रुपये आणि डिझेलचा दर ६२.४६ रुपये आहे. जो या देशात सर्वात जास्त आहे. दुष्काळाच्या नावाने जो ११ रुपये सरचार्ज लावला जातो, ते सुद्धा चुकीचे आहे. एकूण ५९.५ टक्के कर पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांवर लावला जातो, जो सर्वात जास्त आहे आणि याला आमचा विरोध आहे, असे संजय निरुपम म्हणाले. यापुढे ते म्हणाले, आमची अशी मागणी आहे की ज्या प्रकारे बाकी उत्पादनांवर, बाकी वस्तूंवर GST लावला जातो. त्याच प्रकारे पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांवर GST लागू करावा. GST २८ टक्के आहे. त्यामुळे GST लागू केल्यानंतर पेट्रोलचा दर ५० टक्क्यांनी कमी होईल आणि मुंबईकरांना न्याय मिळेल. तसेच मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर पासून मुंबईतील ६० मुख्य पेट्रोलपंपांवर काँग्रेसचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन आणि पत्रक घेऊन उभे राहणार आणि येणाऱ्या लोकांना ते पत्रक देणार आणि आवाहन करणार “जागो मुंबईकर जागो.” ज्या भाजपने तुम्हाला अच्छे दिनचे आश्वासन दिले होते, त्या भाजपने जाणूनबुजून तुमचे पाकीट कापण्याचे षड्यंत्र रचलेले आहे. अशा भाजपा आणि त्याची सहकारी शिवसेनेच्या विरोधात आम्ही जनजागरण अभियान आम्ही सुरु करणार आहोत. मंगळवार पासून प्रत्येक मुक्या पेट्रोलपंपवर सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ७ काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहतील.
रवींद्र वायकर प्रकरणाबद्दल बोलताना निरुपम म्हणाले की, रवींद्र वायकर एक भ्रष्ट मंत्री आहेत. त्यांचे प्रत्येक बांधकाम अवैध बांधकाम आहे. लोकायुक्तांनी त्यांना क्लीन चीट दिलेली नाही. एका तांत्रिक आधारावर ते रवींद्र वायकर यांची या प्रकरणामध्ये चौकशी करू शकत नाहीत. कारण जे बांधकाम आहे ते वायकर आमदार असताना बनवलेले होते. पण आमच्याकडे असा पुरावा आहे की मंत्री झाल्यानंतरही वायकर त्या अवैध बांधकामाचे संरक्षण करत आहेत. जे पत्र आरेने म्हाडाला पाठवले होते, त्या पत्राच्या आधारावर सुद्धा म्हाडाने कोणतीही प्रतिक्रिया, कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यावेळी वायकर म्हाडामध्ये मंत्री होते. मंत्री व्हायच्या अगोदर आणि मंत्री झाल्यानंतरही ज्या ट्रस्टकडे ही अवैध व्यायामशाळा आहे, त्याचे वायकर प्रमुख संचालक आहेत आणि जेव्हा त्यांचे नाव या अवैध बांधकामामध्ये आले. तेव्हा त्यांनी ते अवैध बांधकाम शासनाच्या स्वाधीन केले. जर ते म्हणतात की सत्याचा विजय झाला तर ते अवैध बांधकाम त्यांनी कशाला शासनाला परत केले. म्हणजे ते बांधकाम अवैध होते, वायकर या प्रकरणात अडकले होते, म्हणून त्यांनी ते बांधकाम शासनाला परत केले आणि आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी आम्हाला जेव्हा अंतिम निकालाची प्रत मिळेल, ती घेऊन आम्ही हायकोर्टात जाणार. कारण लोकायुक्त जरी या प्रकरणाची चौकशी करू शकत नसले, तरी हायकोर्टाला त्याचा अधिकार आहेत आणि म्हणून आम्ही हे प्रकरण हायकोर्टात नेणार.
मुंबईमध्ये भांडूप येथे होणाऱ्या महापालिकेच्या पोटनिवडणूकीबद्दल बोलताना संजय निरुपम म्हणाले की या देशामध्ये ईव्हीएम मशीनवर कोणालाही विश्वास नाही. कारण ईव्हीएम मशीन मुळे भाजपने संपूर्ण देशामध्ये निवडणुकीत घोळ केला. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीनचा वापर झाला नाही. त्या ठिकाणी भाजप हरली. यासाठी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की भांडूप येथील महापालिका वार्ड क्र. ११६ येथे होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये पेपर ट्रे चा वापर करावा. ज्याचे तांत्रिक नाव आहे वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडीट ट्रे (VVPAT). ज्यामध्ये मत दिल्यावर मतदाराला त्याची पोच (स्लीप) मिळते. नांदेड येथील निवडणुकांमध्ये या तंत्राचा वापर होणार आहे. यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत, असेही संजय निरुपम म्हणाले
 

Web Title: 'Jago Mumbaikar Jago' movement on Congress's petrol pump; Put Petroleum Products in GST - Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.