Join us  

जहांगीर सबावाला यांचा जीवनपट उलगडणार!

By admin | Published: October 19, 2015 1:39 AM

जहांगीर सबावाला यांच्या जीवनपटाचा समृद्ध खजिना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘अनपॅकिंग द स्टुडिओ :

मुंबई : जहांगीर सबावाला यांच्या जीवनपटाचा समृद्ध खजिना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘अनपॅकिंग द स्टुडिओ : सेलीब्रेटिंग द जहांगीर सबावाला बिक्वेस्ट’च्या माध्यमातून उलगडला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेरणा घेत लवकरच वस्तुसंग्रहालयात जहांगीर सबावाला यांच्या कलाकृती आणि स्मृतींना उजाळा देणारे कायमस्वरूपी दालन सुरू होणार आहे.या प्रदर्शनाची संकल्पना सबावाला यांचे स्नेही, कवी रणजीत होस्कोटे यांची आहे. पाच विभाग असलेल्या या प्रदर्शनात सबावालांच्या कारकिर्दीत त्यांचा स्टुडिओ, अ‍ॅकॅडमी, गॅलरी आणि वस्तुसंग्रहालय इ.मधील परस्पर घनिष्ठ संबंधाचा परिणाम साधत या प्रदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले आहे. सबावालांच्या कलाकृतींवरील जपानी व हिमालयीन कलाकृतींचा प्रभाव स्पष्ट करण्याच्या हेतूने संग्रहालयातील काही कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. हे प्रदर्शन सबावाला यांच्या पत्नी शिरीन सबावाला यांनी संग्रहालयास दिलेल्या ठेव्यामधून कलारसिकांच्या भेटीस आले आहे.हे प्रदर्शन १९२० आणि १९५०च्या दशकात मुंबईच्या सर जमशेटजी जिजीभॉय स्कूल आॅफ आर्ट येथे घडलेल्या तात्त्विक व अभ्यासक्रमविषयक प्रयोगशीलतेवर भाष्य करते. तत्कालीन संदर्भावर सबावालांच्या कलाकृतींचे पुनरावलोकनही या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे. प्रदर्शनात ‘इमॅजिनेशन्स चेंबर’, ‘स्केच, ड्राफ्ट, इमेज’, ‘रेवी, फंताझिया, क्वेस्ट’, ‘द स्कूल आॅफ बॉम्बे’ आणि ‘स्टेज आॅफ व्ह्युविंग’ असे विभाग आहेत. हे प्रदर्शन ३१ डिसेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील जहांगीर निकोल्सन दालनात खुले राहील. (प्रतिनिधी)