गुढीपाडव्यानंतर प्रचारासाठी आता 'जय भीम' चा नारा; उमेदवार मतदारांच्या घरी
By स्नेहा मोरे | Published: April 11, 2024 08:45 PM2024-04-11T20:45:24+5:302024-04-11T20:45:41+5:30
डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, १४ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईतील वरळी विभागात जल्लोष जयंतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई - गुढीपाडव्याच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ झाल्यानंतर आता राजकीय पक्षांसह उमेदवार आणि नेत्यांनी आगामी डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीच्या निमित्ताने आता 'जय भीम'चा नारा हाती घेण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवर डॉ. आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक - सांस्कृतिक उपक्रम, सभा, मतदारांच्या गाठीभेटी, मतदारांशी संवाद साधण्यावर नेत्यांसह उमेदवारांकडून भर देण्यात येणार आहे.
१४ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईतील वरळी विभागात जल्लोष जयंतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचे आयोजन विचार महोत्सव समिती, भीमोत्सव समितीने केले आहे. या वेळी, दक्षिण मुंबईतील उमेदवार आणि नेते महोत्सवाच्या निमित्ताने प्रचार करत भाषण देत आपले विचार मांडतील. याखेरीस, मुंबई भाजपाकडून संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता अशा आशयाचे १४ महत्त्वाचे मेळावे आणि १४० वस्त्यांमध्ये संवादाचे कार्यक्रम करणार आहेत.
याखेरीस, विविध नेते आणि उमेदवारांकडून या दिवशी शहर उपनगरातील बुद्ध विहार आणि नालंदा विहार येथे भेट देत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे विचार मांडणाऱ्या पारंपरिक - जुन्या गाण्यांच्या सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचविण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सोशल मीडीया टीमकडूनही विविध पोस्ट्स, संदेश आणि व्हिडिओ शेअर केले जात आहे. शिवाय, त्याचप्रमाणे लोकसभा मतदारसंघातील या मतदारांची ताकद लक्षात घेऊन त्या- त्या ठिकाणचे उमेदवार मतदारांवर लक्ष केंद्रित करत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांंचे प्राबल्य असलेल्या वसाहतींमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त मतदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
सोशल मीडीयावर विशेष हॅशटॅग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो वा आगामी सण - उत्सव अनेकदा पक्ष व उमेदवारांकडून स्थानिक मतदारसंघासाठी विशेष हॅशटॅग करण्यावर भर दिला जातो. जेणेकरुन, ठराविक दिवशी त्या परिसरातील सोशल मीडीयाच्या विविध व्यासपीठांवर विशेष हॅशटॅग दिसून शक्ती प्रदर्शन करण्यात येते. तसेच, परिसरातील सोशल मीडीया इन्फ्ल्युएर्न्सला हाती घेऊन असे हॅशटॅग जास्तीत जास्त पोस्ट व्हावे याचीही खबरदारी घेण्यात येते. यासाठी काही दिवसांपूर्वीपासून सोशल मीडीया टीमला रिल्स, व्हिडिओ, पोस्टसाठी ठराविक पद्धतीने कंटेट तयार करणे, व्हिडिओची निर्मिती करणे असा आराखडा तयार करुन कृतीशील काम दिले जाते