मुंबई : बोरीवली (पूर्व) येथील गेली १४ वर्षे रखडलेल्या जय महाराष्ट्र नगर स्वयंपुनर्विकास प्रकल्पातील सर्व अडसर दूर करण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाचे उच्चपदस्थ अधिकारी व जय महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण महासंघाचे प्रतिनिधी यांच्यात मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही सुद्धा आव्हाड यांनी दिली.
बोरीवली (पूर्व) मागाठाणे व्हिलेज मधील टाटा पॉवर हाऊस नजीक १९७६ साली म्हाडाने निवासी वसाहत निर्माण केली. ही वसाहत मागाठाणे वसाहत म्हणून ओळखली जात होती. नंतरच्या काळात म्हाडाने तिचे ‘जय महाराष्ट्र नगर’ असे नामकरण केले. २००६ साली पुनर्विकासाचे वारे वाहू लागले. त्यावेळी ‘जय महाराष्ट्र नगर’मधील एकूण ६४० सदनिका असलेल्या आठ सहकारी गृहनिर्माण संस्था एकत्र आल्या आणि ‘जय महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण महासंघ’ स्थापन झाला. महासंघाने एका विकासकाची निवड केली होती, इतकेच नव्हे तर बांधकामासाठी आवश्यक त्या परवानग्यासुद्धा म्हाडाकडून प्राप्त केल्या होत्या. परंतु दुर्दैवाने हा प्रकल्प बारगळला. त्यामुळे रहिवासी नाराज झाले. काही काळ सर्व ठप्प होते.
महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गावडे तसेच विजय केळुसकर, प्रशांत जाधव व मनोज दळवी या सदस्यांनी स्वयंविकासाचा प्रस्ताव महासंघासमोर ठेवला आणि तो सर्वानुमते मंजूर झाला. महासंघाने वास्तुविशारद म्हणून मेसर्स शशी प्रभू असोसिएट्स यांची नियुक्ती केली. त्यानंतर पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडास सादर करण्यात आला. परंतु कामाला गती मात्र येत नव्हती.
अखेरीस ‘जय महाराष्ट्र नगर’मधील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, दीपक भातुसे व संदीप वैद्य यांनी पाठपुरावा करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर व अन्य उच्च पदस्थ अधिकारी, शशी प्रभू असोसिएट्सचे अमोल प्रभू, क्षितिज वेदक तसेच ‘जय महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण महासंघा’चे अध्यक्ष नरेंद्र गावडे, सचिव राजन सावंत व कार्यकारिणी सदस्य प्रशांत जाधव यांची संयुक्त बैठक मंत्रालयात घडवून आणली.
‘जय महाराष्ट्र नगर’ पुनर्विकास आराखड्यांना चार दिवसांत मंजुरी देण्यात येईल. चटई क्षेत्र अडीचऐवजी तीन देण्यात येईल. प्रकल्पास गती मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रासह अन्य आवश्यक त्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्यात येतील. म्हाडाकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई करण्यात येणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही देण्यात आली.
मंत्रालयातील संयुक्त बैठक ठरली महत्त्वाची
महासंघाने वास्तुविशारद म्हणून मेसर्स शशी प्रभू असोसिएट्स यांची नियुक्ती केली. त्यानंतर पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडास सादर करण्यात आला. ‘जय महाराष्ट्र नगर’मधील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, दीपक भातुसे व संदीप वैद्य यांनी पाठपुरावा करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर व अन्य उच्च पदस्थ अधिकारी, शशी प्रभू असोसिएट्सचे अमोल प्रभू, क्षितिज वेदक तसेच ‘जय महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण महासंघा’चे अध्यक्ष नरेंद्र गावडे, सचिव राजन सावंत व कार्यकारिणी सदस्य प्रशांत जाधव यांची संयुक्त बैठक मंत्रालयात घडवून आणली.