Join us

जय मल्हारच्या दागिन्यांनी यंदा सजणार गौराई

By admin | Published: September 12, 2015 10:43 PM

गणपती बाप्पांसोबतच गौराईला सजवण्यासाठी बाजारपेठ नावीन्यपूर्ण दागिन्यांसह मोहक मुखवट्यांनी सजली आहे. कागद, पितळ तसेच पीओपी व फायबरने बनवलेले मुखवटे बाजारात

- भाग्यश्री प्रधान,  ठाणेगणपती बाप्पांसोबतच गौराईला सजवण्यासाठी बाजारपेठ नावीन्यपूर्ण दागिन्यांसह मोहक मुखवट्यांनी सजली आहे. कागद, पितळ तसेच पीओपी व फायबरने बनवलेले मुखवटे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, त्यांचे भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच जय मल्हारमधील गौरीच्या दागिन्यांना बाजारात मोठी मागणी आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे पेणवरून आणलेल्या गौरीच्या मुखवट्यांचे भाव वाढल्याचे सांगितले जाते. फायबर व पीओपीने तयार केलेले मुखवटे ४०० ते १२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर, पितळेचे मुखवटे ५०० ते ३००० पर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कागदी मुखवट्यांची किंमत २० पासून ५० रुपयांपर्यंत आहे. या कागदी मुखवट्यांमध्येही नथ तसेच चमकी लावलेले दागिने उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तेरड्याच्या पानांचा वापर क रून गौर बांधण्याची प्रथा आहे. त्या बांधताना कागदाच्या मुखवट्यांचा जास्त वापर केला जातो. तसेच गौरी बांधण्यासाठी फायबरचे हातही ५०० पासून १००० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. एक ग्रॅममधील तसेच पूर्वजांच्या अस्सल सोन्याच्या दागिन्यांचाही वापर गौरीसाजसाठी केला जातो. जय मल्हार नथ १२०-१५०, जय मल्हारमधील हार १२००-१५००, तर कुड्या २० रुपयांना मिळत आहेत. जय मल्हार ज्वेलरीचा पूर्ण सेट ३५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. याशिवाय चिंचपेटी, मोत्यांच्या माळा, पोहेहार आदी पारंपरिक दागिन्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळी पोत आणि त्यावर नथीच्या आकाराची वाटी व नथीच्याच आकाराचे कानांतले बाजारात मिळत आहेत. तसेच गौरीच्या स्टॅण्डलाही बाजारात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ते लोखंडाचे असल्याने काम झाल्यानंतर व्यवस्थित ठेवल्यास खराब होत नसल्याचेही विक्रेत्या स्वाती ठाकरे यांनी सांगितले. तसेच काही जण पत्र्याचे स्टॅण्ड, लाकडाचे स्टॅण्ड घरीच बनवतात. या स्टॅण्डमध्ये धान्य भरण्याची प्रथाही रूढ आहे. गौरी विसर्जनानंतर हे धान्य प्रसाद म्हणून वाटण्याची परंपरा आहे. तयार पाचवारी साड्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असून त्या गौरीच्या साइजप्रमाणे शिवल्या जातात. त्या ४००-१६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नऊवारी साड्यांनाही या दिवसांत मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्या सर्वांनाच नेसता येत नाहीत. तसेच घरात नऊवारी साड्या नेसणाऱ्या स्त्रियाही कमी झाल्या आहेत. त्यामुळे साइजप्रमाणे शिवलेल्या नऊवारी साड्यांना बाजारात जास्त मागणी आहे. त्या ५०० पासून ते १५ हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.