मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार रात्रीचा दिवस करत आहे. सभा, रॅली यासोबत दारोदारी फिरण्यावर उमेदवारांचा भर आहे. मात्र या सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोशल मिडीया सोशल मिडीयाच्या माध्यमातून कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार मेहनत घेत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी उभे राहिलेले पार्थ पवार यांच्या सोशल मिडीयाची जबाबदारी सख्खा भाऊ जय पवारने घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ मतदार संघासाठी पार्थ पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांपासून सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पवार घराण्याकडून पार्थचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे. सोशल मीडिया हे हल्ली प्रचाराच सर्वात वेगवान माध्यम असल्याने याची जबाबदारी जय पवारने उचलली आहे. पार्थ पवार यांच्या विजयासाठी सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी जय पवार सज्ज झालेत.
आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडला. वडील अजित पवारांकडून बैठकांचे सत्रच सुरु आहे. आई सुनेत्रा पवार महिलांना एकत्र करून छोटेखानी सभा-बैठका पार पाडत आहेत. गेल्या दोन दिवसापासून रोहित पवारही काकांच्या सूचनेनंतर प्रचारात सक्रिय झाले आहेत. जाहीर सभा, बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील. पवार घराण्याची तिसरी पिढी राजकरणात आली आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या पिढीला संधी देण्यासाठी शरद पवार यांनी माघार घेतली.
त्यामुळे सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी तरुण वर्गाचा सहभाग महत्वपूर्ण असल्याने जय पवार हे पार्थ पवार यांचा सोशल मीडियावर प्रचार करण्यास मदत करणार आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त तरुण वर्गापर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया खूप फायदेशीर ठरणार आहे.