राणीच्या बागेत ‘जय’, ‘रुद्र’ चा रुबाब ! डोरा, सिरो आणि निमो पेंग्विनही येणार मुंबईकरांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 09:57 AM2023-05-11T09:57:26+5:302023-05-11T09:58:13+5:30
भायखळा येथील राणीची बाग हे मुंबईकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण. येथील प्राणिसंग्रहालयात ३५० पेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी आहेत.
मुंबई : भायखळा येथील राणीची बाग हे मुंबईकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण. येथील प्राणिसंग्रहालयात ३५० पेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी आहेत. पर्यटकांचा सध्या राबता असलेल्या राणीच्या बागेत ‘जय’ आणि ‘रुद्र’ या वाघाच्या बछड्यांची डरकाळी घुमणार आहे. रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीचा रुबाब उद्यापासून पर्यटकांना पाहायला मिळणार आहे.
पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब विस्तारले आहे. ‘शक्ती आणि करिश्मा’ या रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन बछड्यांना जन्म दिला. दोन्ही बछड्यांचे वय सहा महिने इतके आहे. दोन्ही बछडे त्यांच्या आवारात सैर करीत असतात. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद उद्यापासून घेता येणार आहे, असे उपायुक्त किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी सांगितले.
Jayant Patil: जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; सोमवारी हजर राहण्याचे आदेश, राजकीय चर्चांना उधाण
प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी तीन पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता १५ झाली आहे. पेंग्विन कक्षातील डोनाल्ड आणि डेझी या जोडीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने २ ऑक्टोबर २०२२ रोजी सिरी (मादी), तर पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने १३ डिसेंबर २०२२ रोजी निमो (नर) अशा तीन पिल्लांना जन्म दिला.