नवी दिल्ली - पश्चिम बंगाल आणि ओडिशातील अम्फान चक्रीवादळानंतर अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्रात धडकले आहे. ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगाने चक्रीवादळाने रायगडमधल्या अलिबाग, श्रीवर्धनला धडक दिली. या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांतील घरांचे पत्रे उडून गेले आहेत. थोड्याच वेळात चक्रीवादळ मुंबई, ठाण्याला धडक देण्याची शक्यता आहे. मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचं, घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन् फोटो या वादळ्याच्या तडाख्यातही उभा आहे.
भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा दिसत आहे. या पुतळ्याशेजारीच भगवा ध्वजही फडकत आहे. आकाशातून कोसळणारा धो धो पाऊस अन् थैमान घालणारं वादळी वारं, यातही तो पुतळा दिमाखात उभा असून भगवा ध्वजही डौलात फडकताना दिसत आहे. नितेश राणे यांनी या व्हिडिओसह जय शिवराय... म्हणत अशा वादळांना पेलण्याची ताकद शिवरायांच्या महाराष्ट्रात असल्याचां संदेश दिलाय. राणेंच्या या ट्विटवरुन अनेकांनी कमेंट करुन, कित्येक वादळ छत्रपती शिवाजी महाराजांनी सहज पेलली आहेत, आम्हाला वादळाशी झुंज देता येते, असे सूचवले आहे. राणे यांनी शेअर केलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे माहिती नाही. मात्र, महाराष्ट्राला संकटाशी सामना करण्यास ऊर्जा देणारा हा व्हिडिओ आहे,
दरम्यान, महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकलं आहे. पुढचे तीन तास हे वादळ राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. हे वादळ रायगड, मुंबई, ठाणे येथून पुढे सरकणार आहे, या भागात वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडण्याची, फांद्या कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रातले निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तर पूर्वेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकले आहे. आज दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 120किलोमीटर पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.