सयाजी शिंदेंचा शिवसंकल्प, गड-किल्ल्यांवर 400 झाडे लावून यंदा शिवजयंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:26 PM2021-02-08T14:26:39+5:302021-02-08T14:29:12+5:30
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या लढाईत सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली.
मुंबई - सयाजी शिंदे हे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर उजाड डोंगर हिरवेगार करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून अभिनेते सयाजी शिंदे करीत आहेत. ही वृक्षलागवड आता गाण्याच्या माध्यमातून लोकचळवळ होऊ लागली आहे. त्यातूनच, यंदाच्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर 400 झाडे लावण्याचा संकल्प सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्यागडकिल्ल्यांवर मशाल पेटली पाहिजे, त्यासोबत हिरवी मशालही दिसली पाहिजे, असे शिंदे यानी म्हटले, ते स्वत: शिवजयंती दिनी पन्हाळगडावर जाऊन वृक्षारोपण करणार आहेत.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या लढाईत सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. सह्याद्रीच्या प्रत्येक झांडांचीही स्वराज व्हाव हीच इच्छा होती, पण पूर्ण सह्याद्री बोरका करुन टाकलाय आपण. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, झाडं म्हणजे रयतेची लेकरं, असं तळमळीनं सांगणाऱ्या महाराजांचं आपण ऐकणार आहोत की, नाही. आपण शिवरायांचे मावळे आहोत, येत्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर 400 झाडे लावण्याचा संकल्प आपण करुयात. गडावर मशाल घेऊन जाऊ, पण हिरवी मशाल.. झाडांची मशाल... कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही, असे सयाजी शिंदे यांनी म्हटलं. सयाची शिंदेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, सयाजी शिंदे यांच्या तंबुरा या पुस्तकाचही दोन दिवसांपूर्वी प्रकाशन झाले आहे, त्यावेळीही वृक्षसंवर्धन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचं असल्याचं मत सयाजी शिंदेंनी व्यक्त केलं.
ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनामुळे लोकांना कळाले
कोरोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजनचे महत्त्व कळले. याची कमतरता जाणवू लागल्याने काय स्थिती होते, याची जाणीव झाली. झाडांच्या माध्यमातून मोफत मिळणाऱ्या आणि पैसे देऊनही न मिळणाऱ्या ऑक्सिजनबाबत सर्वांचेच डोळे उघडले. पण, तोपर्यंत डोळे पांढरे होण्याची वेळ अनेकांवर आली. कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या तरी माणसाला शांती आणि समाधान हवे असते ते विकत मिळत नाही. पण झाडाखाली बसला तर या दोन्ही गोष्टी मिळतात. कोट्यवधी रुपयांच्या गाडीत बसल्यानंतरही जेव्हा गाडीबाहेर उतरतो, त्यावेळी आपण गाडीही झाडाखाली लावायला सांगतो. मग पैसा महत्त्वाचा की झाड?, असा सवालही शिंदे यांनी विचारला आहे.