‘जय सीयाराम’ हीच या देशाची संस्कृती : जावेद अख्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:34 AM2023-11-10T06:34:35+5:302023-11-10T07:14:24+5:30
‘जय सीयाराम’ हा केवळ धार्मिक अस्मितेचा मुद्दा नाही तर ज्या देशात राम व सीता जन्माला आले ती अभिमानाची गोष्ट आहे,’ असे वक्तव्य विख्यात गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी केले.
मुंबई : ‘दीपोत्सवासारख्या कार्यक्रमाला माझ्यासारखी नास्तिक व्यक्ती उपस्थित कशी? असा प्रश्न पडला असेल तर मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, राम आणि सीता हे केवळ हिंदू धर्मीयांचेच नाहीत तर ते या देशाच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे ज्याला राम व सीता माहीत नाहीत ते भारतीयच नाहीत. ‘जय सीयाराम’ हा केवळ धार्मिक अस्मितेचा मुद्दा नाही तर ज्या देशात राम व सीता जन्माला आले ती अभिमानाची गोष्ट आहे,’ असे वक्तव्य विख्यात गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दादरच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अनेक गाजलेल्या चित्रपटांची पटकथा लिहिणाऱ्या सलीम-जावेद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनोगत व्यक्त केल्यानंतर जावेद अख्तर यांनी उपस्थितांकडून त्रिवार ‘जय सीयाराम’ असा जयघोषही करून घेतला.
मनसे दीपोत्सवात रंगली सलीम-जावेद जोडीची मुलाखत
अभिनेते रितेश देशमुख, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व राज ठाकरे यांनी सलीम-जावेद या जोडीला बोलते केले. या जोडीने लिहिलेले २४ पैकी २२ सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. मनसेच्या कार्यक्रमानिमित्ताने अनेक वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना एकत्र ऐकता आली. यावेळी आपल्या जोडीच्या यशामागचे कारण विशद करताना जावेद अख्तर म्हणाले की, ‘दोन समान व्यक्ती एकत्र काम करू शकत नाहीत तसेच दोन भिन्न व्यक्तीही एकत्र काम करू शकत नाहीत. मात्र, ज्या दोन लोकांमध्ये काही गोष्टी समान आहेत व ज्या दोघांची मूल्ये समान आहेत त्या दोघांकडून समान मुद्द्यांवर उत्तम काम होऊ शकते आणि आमच्या जोडीचे तेच यश आहे.’
सलीम खान म्हणाले...
जे चांगले आहे त्याला चांगले म्हणावे, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणावे, याबाबत ज्यांचे एकमत असते त्यांचे काम उत्तम होते.
तुमच्या मते सर्वोत्तम अभिनेता कोण? अशी विचारणा केली असता, सलीम खान म्हणाले की, प्रत्येक काळानुरूप अभिनेत्यांनी आपला ठसा उमटवला आहे. दिलीप कुमार, अशोक कुमार हे सर्वोत्तम होते.
आजच्या लेखनाबद्दल परखड वक्तव्य करताना सलीम खान म्हणाले की, पटकन प्रसिद्धीचा लोकांना सोस आहे. मग वाईट, द्विअर्थी असे लेखन केले जाते. शाश्वत लेखन मूल्याची जपणूक करण्याचे भान लेखकाने सोडता कामा नये.