मुंबई : दक्षिण मुंबईतील नामांकित जयहिंद महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वाय-फाय सेवेसाठी आकारलेल्या जास्तीच्या शुल्कामुळे महाविद्यालय प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाकडून स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, महाविद्यालयाने कॅपिटेशन शुल्क कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या परवानगीशिवाय वाय-फायचे अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून गोळा केल्याचा आरोप महाविद्यालयावर सिद्ध झाला असून, याची प्रत मुंबई विद्यापीठाला पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
जयहिंद कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वाय-फायसाठी जादा शुल्क आकारल्याचे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उघडकीस आणले होते. त्यानंतर, या संदर्भात मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही केली होती. मात्र, मनविसेच्या या तक्रारीकडे विद्यापीठ प्रशासनाने कानाडोळा केला. त्यामुळे मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गांगुर्डे आणि वैभव शिंदे यांनी उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी दिली. या तक्रारीची दखल घेत शिक्षण सहसंचालक विभागाने कॉलेज प्रशासनाला नोटीस धाडली. त्यानंतर, त्रिसदस्यीय समितीची स्थापना करत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या समितीने अहवाल सादर केला आहे. यानुसार, महाविद्यालयाने २०१४ ते २०१७ दरम्यान १००० हून अधिक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १००० रुपये याप्रमाणे शुल्क आकारणी केल्याचे उघड झाले आहे. यातील काही विद्यार्थ्यांचेच शुल्क परत करण्यात आले आहे.या प्रकरणी जयहिंद महाविद्यालयाचा स्वायत्ततेचा दर्जा, तसेच मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेला बेस्ट कॉलेज अॅवार्ड रद्द करत महाविद्यालयीन प्रशासनावर दंडात्मक कारवाई करावी.- आदित्य शिरोडकर, अध्यक्ष, मनविसे