मुंबई: सामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडल्याचं त्यांचे वकील यांनी म्हटलं आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा सध्या भायखळ्याच्या तुरुंगात आहेत. नवनीत राणांना स्पॉंडेलिसिसचा त्रास आहे. त्यांच्या वकिलांनी प्रकृतीसंदर्भात तुरुंग प्रशासनाला पत्र लिहिलं आहे.
माझ्या अशिल नवनीत राणांना स्पॉंडेलिसिसचा त्रास होतो. त्यांना तुरुंगामध्ये जमिनीवर बसायला आणि झोपायला लावण्यात आलं. त्यामुळे हा आजार वाढला. डॉक्टरांनी सीटी स्कॅनसाठी विनंती केली. त्यासाठी अर्जही करण्यात आला. मात्र त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. राणा यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी तुरुंग अधिकाऱ्यांची असेल, असं राणांच्या वकिलांनी पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र भायखळा कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिलं आहे.
राणा दाम्पत्यावर सामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याचा, पोलिसांच्या कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय त्यांच्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्ह्याचीदेखील नोंद आहे. न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्यानं अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होईल.