Join us

न्यायाधीशांवर बेछूट आरोप करणारा पक्षकार तुरुंगात; कंटेम्प्टची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:19 AM

न्यायाधीशांवर बेछूट आणि तद्दन निराधार आरोप करणारी फेसबुक पोस्ट लिहून न्यायसंस्थेची समाजमनातील प्रतिमा मलिन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने स्वयंभू पत्रकार व अनेक महत्त्वाच्या जनहित याचिका करणारा पक्षकार केतन तिरोडकर यास तीन महिने तुरुंगात पाठविले आहे.

मुंबई : न्यायाधीशांवर बेछूट आणि तद्दन निराधार आरोप करणारी फेसबुक पोस्ट लिहून न्यायसंस्थेची समाजमनातील प्रतिमा मलिन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने स्वयंभू पत्रकार व अनेक महत्त्वाच्या जनहित याचिका करणारा पक्षकार केतन तिरोडकर यास तीन महिने तुरुंगात पाठविले आहे.तिरोडकर याची फेसबुक पोस्ट हा स्पष्टपणे न्यायालयीन अवमान (कंटेम्प्ट आॅफ कोर्ट) आहे, असा निष्कर्ष नोंदवून न्या. अभय ओक, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. राजेंद्र सावंत यांच्या विशेष खंडपीठाने त्याला तीन महिन्यांची साधी कैद व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.मध्यंतरी न्यायालयाने न्यायाधीशांबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट तिरोडकर याच्या फेसबुक पेजवरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. ज्यांना आपला बचाव करता येत नाही असे न्याायधीश, सैन्यदले व पोलीस दले यांची अत्यंत हीन पातळीवर जाऊन समाजमाध्यमांतून बदनामी करण्याचा कल वाढत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत खंडपीठाने असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशाराही दिला.न्यायालयाने म्हटले की, न्यायालये आणि न्यायाधीश न्यायदानाचे पवित्र काम करत असतात. न्यायाधीशही माणूसच असल्याने तेही चुकू शकतात. त्यामुळे त्यांच्यावरही टीका करण्याचा लोकांना जरूर अधिकार आहे. पण हे करतानाही मर्यादा राखायला हवी. लोकांचा निस्सीम विश्वास हेच न्यायसंस्थेचे बलस्थान आहे. भान आणि मर्यादा सोडून केलेल्या टीकेने या विश्वासालाच तडा जाणार असेल तर असे करणाऱ्यांना न्यायसंस्थेची विशुद्धता जपण्यासाठी खंबीरपणे वठणीवर आणावेच लागेल.कौटुंबिक जीवनातील कटकटींमुळे आपले मानसिक संतुलन ढासळले होते. त्या स्थितीत आपण फेसबुकवर हे लिखाण केले होते.पण आता त्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे, असे सांगून तिरोडकरने माफी मागत क्षमायाचना केली. मात्र ही दिलगिरी मनापासूनची नाही, असे म्हणत न्यायालयाने ती फेटाळली.

टॅग्स :तुरुंग