जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराजांच्या शतकी उपवासाचा पारणोत्सव सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 07:43 PM2024-03-31T19:43:09+5:302024-03-31T19:54:47+5:30
एनएससीआय डोममध्ये पार पडला पारणोत्सवाचा सोहळा, या कार्यक्रमाला मुंबईसह परदेशातूनही भाविकांनी हजेरी लावली होती.
मुंबई - विश्वशांतीच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी गेल्या तब्बल १८० दिवसांपासून उपवास करणाऱ्या प.पू.दिव्यतपस्वी जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांच्या उपवासाची रविवारी (१८१ व्या दिवशी) पारणोत्सव कार्यक्रमादरम्यान सांगता झाली. विशेष म्हणजे, जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराजांच्या या उपवासामुळे दोन विक्रम साधले गेले आहेत.
१८० दिवसांचा हा त्यांचा आजवरचा सातवा उपवास ठरला तर, ३० दिवसांपेक्षा जास्त काळ उपवास करण्याचे शतक देखील नोंदले गेले आहे. या सोहळ्या दरम्यान हंसरत्न सूरि महाराजांना तपो रत्न महोदधि ही पदवी देखील प्रदान करण्यात आली. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यात भजन, सत्संगाच्या सुरात अन् १५ पेक्षा जास्त आचार्य भगवंतांसह तीनशे पेक्षा जास्त साधु-साध्वी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला मुंबईसह परदेशातूनही भाविकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमास उपस्थित आचार्य श्री महाबोधी सूरिश्वरजी महाराज यांनी हंसरत्न सूरि महाराजांच्या उपवासाची महती सर्वांना सांगितली.
ते म्हणाले की, विश्वशांती, अंहिसा तसेच जगात कुणीही उपाशी राहू नये, हा त्यांच्या उपवासामागचा हेतू आहे. पण उपवासाच्या तपासोबतच त्यांच्या मध्ये असलेला परोपकाराचा व करुणेचा गुण मला जास्त भावतो. या उपवासाला अनन्यसाधारण महत्व आहे.
हंसरत्न सूरि महाराजांनी गेल्या १८० दिवसांपासून अन्नग्रहण न करता सकाळी ९ ते सायंकाळी सहा दरम्यान केवळ उकळलेले पाणी पिऊन हा उपवास केला आहे. इतका उपवास करूनही त्यांच्या दैनंदिन साधनेत कोणताही फरक पडलेला नाही.
दरम्यान, या पारणोत्सव कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अभिनेते अक्षय कुमार, लोकमतचे सह-व्यवस्थापकीय संचालक व संपादक संचालक ऋषी दर्डा, शीतल दर्डा, महेन्द्र संदेशा, मीना संदेशा, पृथ्वीराज कोठारी, अभिनंदन लोढा यांनी देखील या कार्यक्रमाला कुटुंबीयांसह उपस्थिती लावली होती.
अक्षय कुमार पाळणार पर्युषण पर्व
जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराजांच्या पारणोत्सव कार्यक्रमादरम्यान आचार्य श्री महाबोधी सूरिश्वरजी महाराज यांनी अक्षय कुमार यांचे स्वागत करतानाच या औचित्यावर एखादा नियम त्यांनी करावा असे सुचित केले. या विनंतीला मान देत अभिनेता अक्षय कुमार यांनी यापुढे प्रत्येक पर्युषण पर्व आपण पाळणार असल्याचे जाहीर केले.
जैन धर्मामध्ये पर्युषण पर्वाला विशेष महत्व आहे. मनात येणाऱ्या सर्व विकारांचे शमन करणे हा पर्युषणाचा मुख्य हेतू आहे. या कालावधीमध्ये जैनधर्मीय लोक एक दिवसांपासून तीस दिवसांपर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक दिवस सूर्योदय ते सुर्यास्तादरम्यान केवळ उकळलेले पाणी पिऊन उपवास करतात.
यावेळी जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांच्या उपवासाबद्दल भाष्य करताना अक्षय कुमार म्हणाले की, आपण इतिहास वाचतो, इतिहासाचा अभ्यास करतो. पण आज महाराजांच्या या ऐतिहासिक उपवासाच्या रुपाने आपण एक इतिहास अनुभवत आहोत. मी दर सोमवारी उपवास करतो. पण तोही कधी कधी सोसत नाही. महाराजांच्या उपवासामागचे हेतू देखील उद्दात आहेत. माझ्यामते शारीरिक, मानसिक आणि आध्यामिक शांतीसाठी प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस उपवास करणे गरजेचे आहे.