जैन समाज एकवटला, संजय राऊत यांचा राज्यभरातून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:56 AM2017-08-25T01:56:19+5:302017-08-25T01:56:57+5:30

जैन मुनी आचार्य नयनपद्म स्वामी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा गुरुवारी राज्यात विविध ठिकाणी निषेध करण्यात आला.

 Jain community united, Sanjay Raut's statewide protest | जैन समाज एकवटला, संजय राऊत यांचा राज्यभरातून निषेध

जैन समाज एकवटला, संजय राऊत यांचा राज्यभरातून निषेध

Next

मुंबई : जैन मुनी आचार्य नयनपद्म स्वामी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा गुरुवारी राज्यात विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. समाजाच्या भावना दुखावल्याने संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अशी एकमुखी मागणी सर्वच ठिकाणी करण्यात आली.
अहमदनगरमध्ये भाजपा व राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन केले. भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपाचे खासदार दिलीप गांधी, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, संजय चोपडा, उबेद शेख, किशोर बोरा, विपुल शेटिया, शैलेंद्र मुनोत, सुमित वर्मा, अजय बोरा आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगारवाला चौकातील जैन मंदिरासमोर राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे, दत्ता पाटील सप्रे, पोपट बारस्कर, वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, अ‍ॅड. वैभव मुनोत आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगरात (जळगाव) जैन समाजबांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता जैन स्थानक येथून निघालेला हा
मूकमोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. निवासी नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांचा राजीनामा घ्यावा. तसेच राऊत यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे हे पक्षाकडून सांगण्यात यावे.
मुनीश्रींच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत राऊत यांनी माफी मागितली तरच समाजाच्या संतप्त भावना शांत होतील, अशी एकमुखी मागणी सकल जैन समाजातर्फे औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली.

औरंगाबादमध्ये जैन समाज एकवटला
जाधवमंडीतील श्री विमलनाथ जैन मंदिरात ही बैठक झाली. बैठक पार पडल्यानंतर मंदिर परिसरात तोंडाला काळ्या फिती लावून खा. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आचार्यांना झेड सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी तसेच खा. राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला. शिवाय जिन्सी पोलीस ठाण्यात समाजातर्फे राऊत यांच्या विरोधात तक्रार देण्यात येणार आहे.

Web Title:  Jain community united, Sanjay Raut's statewide protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.