जैन महामंडळ समाजविकासाचे माध्यम ठरेल : ललित गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:28 AM2024-12-11T09:28:02+5:302024-12-11T09:28:15+5:30
संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने नुकतेच स्थापन केलेले जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जैन युवकांना उद्योजक व रोजगारक्षम बनविण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रमुख माध्यम ठरेल, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
महामंडळाची पहिलीच बैठक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. बैठकीत ललित गांधी म्हणाले की, जैन समाजासाठी अशा प्रकारचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून जैन समाजातील विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका महामंडळ बजावणार आहे. जैन समाजाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असेल.
जैन पाठशाला सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण अहवाल
या बैठकीत जैन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, बेघर लोकांसाठी गृहकर्जाची योजना, व्यापार-उद्योगासाठी सवलतीच्या दरातील कर्ज योजना, शेतकऱ्यांसाठी विशेषत: समूह शेतीसाठी प्रोत्साहन योजना, जैन साधू-साध्वी विहार व्यवस्था, तीर्थक्षेत्र विकास याविषयी निर्णय घेण्यात आले. तसेच जैन पाठशाला सक्षमीकरणासाठी व विहारधाम निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष मितेश नाहटा, संचालक अरविंद शाह, सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, अल्पसंख्याक मंत्रालयाचे उपसचिव मोईन ताशिलदार, व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदुम, विशेष निमंत्रित हितेशभाई मोता, जैन फेडरेशनचे संदीप भंडारी, दिलीप परमार, महावीर जैन, गोपाल रूणवाल उपस्थित होते.