मुंबई : अव्वल मानांकित जैन इरिगेशन संघाने मुंबई महानगर पालिका ‘अ’ संघाचा ३-० असा धुव्वा उडवून २६ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सांघिक ‘अ’ गटात विजेतेपदाला गवसणी घातली.लालबाग येथे झालेल्या पाच दिवसीय स्पर्धेत सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात पहिल्या एकेरी लढतीत जैन संघाच्या पंकज पवारने महापालिका संघाच्या विकास धारियाला २५-१७, २५-१७ असे नमवले. रंगतदार झालेल्या दुसऱ्या एकेरी लढतीत योगेश धोंगडेने संतोष जाधवचा २५-४, १८-२५, २५-१ पराभव करत जैन संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरी गटात देखील जैन संघाच्या महम्मद साजिद - सय्यद मोहसीन जोडीने विनोद बारिया - दिनेश केदार जोडीवर २५-१०, २५-१० अशी सहज मात केली. जैन संघाच्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात एअर इंडिया संघाने मुंबई महानगरपालिका ‘ब’ संघाचे आव्हान ३-० असे मोडीत काढत बाजी मारली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात एअर इंडियाने महानगरपालिका संघाच्या खेळाडूंना पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. तसेच महिला गटात उपउपांत्य फेरीत प्रीती खेडेकरने कविता जाधवचा २५-०, २५-८ असा पराभव केला. दुसरीकडे, काजल कुमारीने स्नेहा मोरेचा २५-११, २५-१ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)
जैन इरिगेशनची बाजी
By admin | Published: January 28, 2017 3:33 AM