उच्च न्यायालय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील ५८ आणि पुण्यासह नाशिक येथील ३ जैन मंदिरांना वर्षातील नऊ दिवसांच्या उपवासासाठीच्या आयंबिल ओळी तपदरम्यान सेवन केले जाणारे विशेष अन्न लोकांच्या घरी पार्सल देण्याची परवानगी दिली आहे.
न्यायाधीश एस.सी. गुप्ते आणि न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठाने असे स्पष्ट केले आहे की, कोणत्याच परिस्थितीत कोणत्याही भाविकांना उपवासादरम्यान मंदिरात जाता येणार नाही.
उपवास १९ ते २७ एप्रिलदरम्यान असतील. जैन समुदायातील बांधवांना उपवासावेळी सेवन केल्या जाणाऱ्या जेवणाचा डबा ट्रस्ट परिसरातून घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका जैन ट्रस्टद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीदरम्यान ट्रस्टचे अधिवक्ता प्रफुल्ल शाह यांनी असे म्हणणे मांडले की, मंदिर किंवा भोजन कक्ष भाविकांसाठी खुले करावे किंवा त्यांनी तिकडे येऊन जेवण करावे, असे आमचे म्हणणे नाही. फक्त त्यांच्या जेवणाचा डबा येथून घेऊन जावा, एवढेच आमचे म्हणणे आहे.
यावर जेवणाचा डबा घेऊन जाण्याची परवानगी दिल्यास मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी केला. खंडपीठाने दाेन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपवासाचे जेवण स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांच्या घरी पोहोचविण्यात येईल, असे स्पष्ट केले.
........................