रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 06:43 AM2023-08-01T06:43:27+5:302023-08-01T06:44:52+5:30
चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे.
मुंबई/पालघर : रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) जवान चेतन सिंहने सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये केलेल्या बेछूट गोळीबारात आरपीएफ अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून सुपरफास्ट पॅसेंजर सुटली. तिने पालघर ओलांडल्यानंतर वैतरणा ते विरार स्थानकादरम्यान तीन डब्यांमध्ये फिरून चेतनने १२ गोळ्या झाडल्या. चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे.
चेतनने हा गोळीबार नेमका का केला, याचे कारण समजू शकलेले नाही. तो तापट स्वभावाचा आहे आणि ड्यूटीवर झोपू न दिल्याने, पूर्णवेळ काम करावे लागल्याने त्याचा वरिष्ठांशी वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र तो सतत जबाब बदलत आहे. इतर प्रवाशांनी पाठलाग करू नये, म्हणून त्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा अंदाजही सुरुवातीला व्यक्त केला जात होता.
मृतांची नावे
या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२, नालासोपारा), असगर अब्बास शेख (४८, रा. मधुबनी, बिहार) यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा (३५ ते ४० वर्षे) मृत्यू झाला आहे.
पाठलाग करत बेड्या
बेछूट गोळीबार केल्यानंतर विरारनंतर एका प्रवाशाने चेन खेचून गाडी थांबवली. तेव्हा मीरा रोड स्थानकाजवळ गाडी थांबली. तेव्हा चेतनने रेल्वेतून उडी मारली आणि धाक दाखवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरपीएफ जवानांनाही त्याने ठार मारण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडील रायफल ताब्यात घेतल्यानंतर त्याला बोरीवली रेल्वे पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी सुरू करण्यात आली.
सर्व बाजूंनी तपास
आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून तपासानंतरच हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
चेतन तापट स्वभावाचा
आरपीएफचे महानिरीक्षक पी. सी. सिन्हा यांनी आरोपी जवान चेतन तापट स्वभावाचा आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो नुकताच सुटीवरून आला होता, असे सांगितले. त्याने प्रथम त्याचे वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीना यांच्यावर गोळी झाडली, त्यानंतर इतर प्रवाशांना मारले, अशी माहिती त्यांनी दिली.
तीन डब्यांत झाडल्या गोळ्या
- मूळचा भावनगरचा रहिवासी असलेला चेतन सिंह २००९ मध्ये वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागला. त्याला दोन मुले आहेत. जानेवारीत पत्र लिहून त्याने आई आजारी असल्याचे सांगत मुंबईत बदली करून घेतली. चेतन हा मुंबई सेट्रल आरपीएफ येथे कार्यरत होता.
- सध्या तो लोअर परळच्या आरपीएफ कार्यालयात तैनात होता. रविवारी तो एका लांब पल्ल्याच्या गाडीवर सुरक्षेसाठी तैनात होता. त्यातून तो सुरत रेल्वे स्थानकावर उतरला. तेथे काही काळ आराम केल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास तो जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये चढला.
- त्यावेळी चेतनसोबत मृत टिकाराम आणि आणखी दोन जवान या गाडीत होते. पहाटे पाचच्या सुमारास वैतरणा ते मीरा रोड स्थानकांदरम्यान त्याने त्याच्याकडील एआरएम रायफलने गोळीबार केला.
- आधी त्याने बी ५ डब्यात टिकाराम व एका प्रवाशावर गोळीबार केला. त्यानंतर तेथून तो अन्नपदार्थ तयार करणाऱ्या डब्यात गेला. तेथे त्याने एका प्रवाशावर गोळ्या झाडल्या. पुढे एस ६ डब्यात त्याने एका प्रवाशावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. चेतनच्या रायफलमध्ये २० काडतुसे होती. या संपूर्ण हल्ल्यात त्याने १२ गोळ्या झाडल्या.