जयपूरमधील प्रदर्शनाचा पालिकेच्या तिजोरीवर भार, आकस्मिक निधीतून उचलणार साडेचार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:22 AM2020-01-28T05:22:57+5:302020-01-28T05:23:09+5:30
‘वाइल्डरनेस फाउंडेशन ग्लोबल’ या जागतिक संस्थेच्यावतीने राजस्थानमध्ये जयपूर शहरात जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईतील वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचे दर्शन घडविणारे भव्य दालन राजस्थानमधील जयपूर येथे भरवण्यात आले आहे. १९ ते २६ मार्च या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व मुंबई महापालिका स्वीकारणार आहे. उत्पन्नात मोठी
घट झाल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात अनके प्रकल्पांना कात्री लागणार आहे. तसेच विविधस्तरावरून टीका झाल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी विविध समित्यांचे दौरे रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर हे दौरे रद्द झाले आहेत. असे असताना मात्र या प्रदर्शनासाठी महापालिकेकडून तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रशासन चक्क आकस्मिक निधीतून रक्कम उचलणार आहे.
‘वाइल्डरनेस फाउंडेशन ग्लोबल’ या जागतिक संस्थेच्यावतीने राजस्थानमध्ये जयपूर शहरात जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत.
११वे वर्ल्ड वाइल्डनेस काँग्रेस प्रदर्शन वन्यजीव संरक्षक या विषयावर आधारित आहे. मात्र या कार्यक्रमाला राजस्थान राज्य शासन सहप्रायोजक असून मुंबई महापालिका मुख्य प्रायोजक आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
प्रत्यक्षात अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होणार आहे.
पाच हजार चौ. फुटांचा कक्ष
या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असल्याने मुंबई महापालिकेसाठी पाच हजार चौ. फुटांचा कक्ष आरक्षित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका दीड कोटी रुपये राजस्थान सरकारला देणार आहे. तसेच जयपूर प्रदर्शनाचा खर्च आणि प्रदर्शनानंतर राणीबागेत भव्य दालन उभारण्यासाठी काही कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रदर्शनासाठी २० अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवास आणि भोजनासाठी ६५ लाखांचा खर्च, एकूण दोन कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च आकस्मिक निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असे आहे प्रदर्शन...
या प्रदर्शनात देश-विदेशातून येणारे पाहुणे, तज्ज्ञ यांना माहिती देण्यासाठी भव्य दालन उभारण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव संरक्षण, पर्यावरण या बाबींचे अधोरेखित करणारे भव्य दालन असणार आहे. त्यामध्ये विविध माध्यमांद्वारे अद्ययावत माहिती प्रदर्शित करून पर्यटकांच्या मनात आवड तसेच आपुलकी निर्माण करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दालन कायमस्वरूपी बनवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रदर्शित करण्यात येणाºया बाबी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.