झायरा वसिम या किशोरवयीन अभिनेत्रीशी विमानात असभ्य वर्तन करण्याचा प्रताप एका सहप्रवाशानं केला. त्यानंतर व्हायरल केलेल्या व्हिडीओत मुलींशी आपण असेच वागणार का, असा प्रश्न झायरानं उपस्थित केला होता. या घटनेनंतर एका संवेदनशील प्राध्यापकानं झायराला लिहिलेलं हे पत्र खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी...प्रिय झायरा,परवा तू दिल्लीहून मुंबईला येताना विमान प्रवासात कुणीतरी सचदेव नावाच्या असभ्य व मनोविकृत व्यक्तीनं तुझा अवमान होईल अशा पद्धतीनं वर्तन केलं. सचदेवच्या अशा वर्तनानं एक पुरुष असल्यामुळं मला लाज वाटते आहे. तुझ्यासारख्या किशोरवयीन मुलींना ज्यांनी अजून पुरेसं जगही पाहिलेलं नाही, त्यांना अशा विकृतीला सामोरं जावं लागणं हे सुसंस्कृत आणि निरोगी समाजाचं लक्षण खचितच नाही. सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना चोरटा स्पर्श करणं हे मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे. विशेषकरून गर्दीच्या ठिकाणी अशा सभ्यतेचा मुखवटा धारण केलेल्या भुरट्या चोरांचा सुळसुळाट झालेला दिसून येतो. बस, रेल्वे, सिनेमागृह, बाजार अशा सर्व ठिकाणी विकृत मनोवृत्तीचे लोक संधी साधत असतात. तुझी मानहानीदेखील अशा प्रकारे सडलेल्या मनोवृत्तीचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. टीव्हीवरील तुझं ते रडवेल्या चेहºयाचं निवेदन पाहून मन सुन्न झालं. तुझ्या प्रत्येक शब्दातून व हुंदक्यातून तुझ्या झालेल्या अक्षम्य अवमानाची जाणीव होत होती. तुझ्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून हे कृत्य व्हावं, याची सल तुझ्याबरोबर आम्हालाही लागली आहे. परंतु अशा विकृत प्रवृत्तीविरुद्ध तू दाखविलेलं धाडस हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. तुझ्या या धाडसाचं कौतुक बहुतांश लोकांना वाटत आहे. एक सेलिब्रिटी असूनही तुला अशा किळसवाण्या परिस्थितीचं बळी व्हावं लागलं. यावरून समाजवर्तन किती खालच्या पातळीला गेलेलं आहे हे लक्षात येतं. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातील मुलींची काय अवस्था होत असेल? याची कल्पनाच न केलेली बरी. कोपर्डीच्या घटनेनं या तथाकथित सभ्य समाजव्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडला. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या तुझ्यासारख्या मुलीला जे भोगावं लागलं, त्याची जगभर चर्चा होत आहे. पण समाजातील असंख्य कन्या आहेत ज्यांना अशा प्रकारच्या मानखंडणेचा आणि विकृतीचा सामना करावा लागतो. विशेषत: दारिद्र्यातील आणि वंचित समाजातील मुलींनाही अशा विकृतींचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. पण त्यांचा आवाज मात्र तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली दाबला जातो. कधी स्वकीय तर कधी उपरे यांच्या अत्याचाराला सर्वच समाज घटकातील मुली बळीठरतात.शाळा-महाविद्यालयांमध्येदेखील मुली सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज वर्तमानपत्रावरून नजर फिरवली तरी किमान असे एकतरी वृत्त असते, की ज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना नमूद केलेली असते. अत्याचार करणारे हे अनेकदा परिचित असतात, असेही आढळून आलेले आहे. समाज व्यवस्थेची जपणूक करण्याची ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, अशा शिक्षकी पेशातील काही विकृतांकडूनही विद्यार्थिनींना बळी व्हावे लागते.पुरुषी सत्ता वर्चस्ववादाची ही मानसिकता आहे, जी स्त्रीला दुय्यम स्वरूपाची वागणूक देते. स्त्री देहावर मालकी हक्क दाखवते. तथाकथित मर्दानगीच्या भ्रामक कल्पनांमुळे अशा विकृतीचा जन्म होत असतो. मुलामुलींचे संगोपन करतानाच त्यांना मुलगा आणि मुलगी असे लिंगभेद जनक परिस्थितीत वाढवले जाते. लहान-मोठ्या घटनांमधून पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ अशी मानसिकता निर्माण केली जाते. स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाची घरातूनच पायमल्ली व्हायला सुरुवात होते. त्याचे रूपांतर पुढे स्त्रीवरील मालकी हक्काच्या कल्पनेत होते. लैंगिकता हा वर्चस्ववादाचा एक भ्रामक मानदंड आहे. परंतु हाच मानदंड वापरून व्यवहारामध्ये स्रियांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. या मानसिकतेमुळेच स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे.पण झायरा... तू निर्भयपणं, धाडसानं आवाज उठवलास! त्यामुळं अनेक मुलींसाठी तू प्रेरणादायी ठरणार आहेस. आम्हा पुरुषांना मात्र एक प्रश्न कायम सलत राहणार तो म्हणजे, तुझ्यासारख्या निरागस, निष्पाप, निर्व्याज किशोरवयीन मुलींसाठी आम्ही कोणता समाज निर्माण करणार आहोत?तुझाच एक समाज बांधव- प्रा. संदीप चौधरी(लेखक हे शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
झायरा आम्ही ‘शरमिंदे’ आहोत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 2:06 AM