जैश-उल-हिंदने घेतली ‘त्या’ कारची जबाबदारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:06 AM2021-03-01T04:06:03+5:302021-03-01T04:06:03+5:30
पोलिसांकडून तपास सुरू : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली होती कार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी ...
पोलिसांकडून तपास सुरू : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली होती कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संंघटनेच्या टेलिग्राम ॲपवरील पेजवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र, प्रसिद्धी मिळविण्यासाठी तसेच तपास भरकटवण्यासाठी हा संघटनेचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पाेलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गुन्हे शाखा तसेच राज्य दहशतवादविरोधी पथक या संदेशाबाबत अधिक तपास करत आहेत.
याआधी दिल्लीतील दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणातही असा दावा करण्यात आला होता. मात्र आतापर्यंतच्या तपासात त्याबाबतचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातही अद्यापपर्यंत कुठलेही दहशतवादी संघटनेचे कनेक्शन समोर आलेले नाही; पण जैश-उल-हिंदने टेलिग्राम अॅपवरील संदेशात ‘मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाबाहेरची स्फोटकांनी भरलेली कार सोडणारा इसम सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. हा फक्त एक ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे’, असे म्हटले आहे. तसेच बिटकॉइनच्या स्वरूपात अंबानी यांच्याकडून रकमेची मागणी करीत ‘आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढच्या वेळेस ही कार तुमच्या मुलांच्या मागे असेल’, अशी धमकीसुद्धा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणेे ‘तुम्हाला जमत असेल, तर आम्हाला थांबवून दाखवा’ असे आव्हानही तपास यंत्रणांना दिले आहे. मात्र, स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या धमकीपत्रात पैशांची मागणी करण्यात आली नव्हती.
....
प्रसिद्धीसाठी धडपड असल्याचा संशय...
ही संघटना नवीन असून, काश्मीरची असल्याचे समजते. प्रसिद्धीसाठी ही जबाबदारी स्वीकारून संघटना तपास भरकटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशयही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पोलीस या सर्व बाबींची शहानिशा करत आहेत.