मुंबई - मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता मराठवाड्यातील भाजपनेते तथा माजी केंदीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी भजपच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. जयसिंगराव गायकवाड यांच्या पक्ष राजीनाम्यानंतर मराठवाड्यातील पक्षाच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रशेत केला होता. त्यानंतर ते पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये परतले होते. मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा यांनी प्रतिक्रिया देताना, जयसिंगराव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते ऐकले नाहीत, असे म्हटले आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन पंकजा मुंडेंनी आदरांजली वाहिली. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना जयसिंगरव गायकवाड यांच्या राजीनाम्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, जयसिंगराव यांना समजावण्याचा खूप प्रयत्न झाला, मात्र त्यांनी ऐकलं नाही. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत पक्ष आणखी ताकदीने लढणार असल्याचं पंकजा यांन म्हटलंय.
उमेदवारी अर्ज मागे
गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे.
गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय
जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. मराठवाड्यात भाजपच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. मध्यंतरी पंकजा मुंडे यांचे नाराजी नाट्य घडले. तेव्हा, गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात असतानाही जयसिंगराव यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे आता पंकजा मुंडे जयसिंग रावांच्या या भूमिकेवर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. जयसिंगरावांनी आपल्या कारकिर्दीत, माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, माजी सहकार राज्यमंत्री, दोन वेळा माजी मराठवाडा पदवीधर आमदार, तसेच तीन वेळा बीड जिल्ह्याचे खासदार, अशी अनेक पदे आजवर उपभोगली आहेत. ते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते. गायकवाड यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती फेसबुकवरीही दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरही राजीनाम्याची कॉपी शेअर केली आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही यायला सुरुवात झाली आहे.