जेटीसाठी स्थानिकांना जिंदालकडून आमिषे
By admin | Published: February 9, 2015 10:58 PM2015-02-09T22:58:43+5:302015-02-09T22:58:43+5:30
नांदगाव येथील प्रस्तावित जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या जेटीला मच्छीमाराकडून वाढणारा विरोध आणि फ्लोट्सचे
हितेन नाईक, पालघर
नांदगाव येथील प्रस्तावित जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या जेटीला मच्छीमाराकडून वाढणारा विरोध आणि फ्लोट्सचे वाटप केले जात असताना दुसरीकडे सातपाटी-मुरबे खाडीत प्रस्तावित असलेल्या अरवाना इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या जेटीला विरोध होऊ नये म्हणून मच्छीमार तरूणाना आमिषे दाखविली जात आहेत. मच्छीमारांचा विरोध मोडण्यासाठी काही संधीसाधू मच्छीमारांचा वापर करण्याची ही खेळी खेळली जात आहे.
पालघर तालुक्यातून प्रस्तावित बंदराच्या उभारणीला परिसरातील गावामधील मच्छीमार, बागायतदार शेतकरी व स्थानिकानी मोठा विरोध दर्शविला आहे. या बंदराविरोधात ७ आॅक्टो. २०१२ रोजी बोईसर येथे झालेल्या बैठकीत एकमुखाने सर्व स्तरावरून विरोध दर्शविण्यात आला होता. तरीही जिंदाल समूहाकडून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बैठकीत स्थानिकांची मवाळ भूमिका असल्याची कागदपत्रे सादर केली होती. तर काही सरपंचानी या बंदराला विरोध नसल्याची खोटी कागदपत्रे बनविण्यात आल्याचे उघड झाले आहे मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख धीरज गावड यांनी सांगितले. त्यामुळे जिंदाल समूह मच्छीमारात फूट पाडण्याचे षडयंत्र रचित असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिंदाल समूहाचे व्यवस्थापक सज्जन जिंदाल यांनीही लोकांना जर हा प्रकल्प नको असेल तर तो लादला जाणार नाही असे नांदगावमध्ये येऊन जाहीर केले होते. परंतु दुसरीकडे अंतर्गतरित्या मात्र जिंदाल समूहाच्या कारवाया सुरूच असून विरोध मोडून काढण्यासाठी प्रलोभनाचा वापर केला जात आहे. जिंदालकडून स्थानिक विकास योजना राबविण्यात येत असल्याच्या नावावर सातपाटी मधील एका मच्छीमार पदाधिकाऱ्याच्या मार्फत मच्छीमारांना जाळी व फ्लोटसचे विनामूल्य वाटप केले जात असल्याचे कळल्यानंतर गावामध्ये संतापाचे वातावरण आहे. परंतु सातपाटीमधूनही काही मच्छीमार पदाधिकारी अरवाना इन्फ्राक्ट्रक्चर लि. या कंपनीला पाठींबा दर्शवून काही तरूणांना नोकरीचे खोटे आमिष दाखवीत असतील तर आम्ही जिंदालला पाठींबा दिल्यास बिघडले काय? असा? असा प्रतिप्रश्न जाळी वाटप करणाऱ्या मच्छीमाराने आपले नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलतांना केला. दोन्ही बंदराच्या प्रस्तावाच्या समर्थकाकडून मच्छीमार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, तरूण यांना विविध आमिषासह गोवा, गणपतीपुळे, देवगड येथे सहली आयोजित करून पार्ट्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्वत्र प्रक्षुब्ध वातावरण आहे. त्यामुळे आता सातपाटी मधील तरूणांनी एकत्र येऊन लढा देण्याचे ठरविले असून कुठल्याही परिस्थितीत जिंदाल किंवा अरवाना बंदराचे उभारणीचे काम सुरू करू दिले जाणार नाही असे सातपाटी ऐकता मंडळाचे अध्यक्ष रितेश पागधरे यांनी सांगितले.