Join us

जैतापूर प्रकल्प हद्दपार करणारच

By admin | Published: October 04, 2016 12:52 AM

विनायक राऊत : सोनारगडगा येथील धरणे आंदोलनात सहभाग

राजापूर : शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कायमच विरोध केला आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. त्यापेक्षा काहीही मोठे नाही, त्यामुळे संघटित होऊन कुठल्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प हद्दपार करणारच, असा निर्धार खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्प परिसरातील सोनारगडगा येथे व्यक्त केला.जैतापूर प्रकल्प क्षेत्रात जनहक्क समिती व शिवसेनेने दोन दिवसांपासून धरणे आंदोलन व उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी खासदार विनायक राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकल्पविरोधकांना बळ दिले. त्यावेळी आमदार राजन साळवी, जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, सचिव दीपक नागले, पर्यावरण नेत्या वैशाली पाटील, माजी आमदार गणपत कदम, सेना उपजिल्हाप्रमुख अशोक सक्रे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, जिल्हा परिषद सभापती दुर्वा तावडे, मच्छिमार नेते अमजद बोरकर, सेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाधिकारी, मच्छिमार बांधव उपस्थित होते. अत्यंत घातक व तेवढाच विनाशकारी प्रकल्प यापूर्वीच्या शासनाने कोकणवासियांच्या माथी मारला आहे. मात्र, आपण संघटीत राहून तो हद्दपार करायचा आहे, असे सांगत राऊत यांनी मागील काही दिवस जैतापूर प्रकल्पाविषयी होत असलेल्या आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला व तसे प्रकारही सुरु असल्याचे सांगितले.यावेळी आमदार राजन साळवी यांनी, या प्रकल्पाविरोधातील लढ्यातील सेनेच्या भूमिकेवर प्रकाशझोत टाकत शिवसेना कायम तुमच्यासोबत राहील, अशी ग्वाही दिली. पर्यावरण नेत्या वैशाली पाटील यांनीही शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसदेत जैतापूर प्रकल्प हद्दपार व्हावा, म्हणून आवाज उठवावा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)ग्रामसभांचे ठराव पाठवाजैतापूर प्रकल्प रद्द व्हावा म्हणून परिसरातील बारा गावांनी जसे ग्रामसभांचे ठराव करून पाठविले आहेत. तसे ठराव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी करून पाठवावेत, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.