लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पीओपी गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता आपल्याला जीवन हवे आहे की जीवनशैली हे ठरवावे लागेल. शाडूच्या पारंपरिक गणेश मूर्तींमुळे श्रद्धा आणि भावनांमध्ये कुठेही कमतरता येत नाही, हे आता नागरिकांनीही समजून घेतले पाहिजे, अशी भूमिका पर्यावरणवाद्यांनी घेतली आहे. पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी कायम ठेवली पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
पीओपी गणेश मूर्तींमुळे कुठेही पर्यावरणाला धोका पोहोचत नाही, उलट रासायनिक कंपन्यांचे जे पाणी समुद्रात सोडले जाते त्याने अधिक प्रदूषण होते आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे उत्सवाची शान राखण्यासाठी आणि उत्सवावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून पीओपी मूर्तींवर बंदी घालू नये, अशी मागणी मूर्तिकार संघटनांनी केली आहे.
काय महत्त्वाचे? या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ पर्यावरणवादी गिरीश राऊत म्हणाले, “आता आपण जगण्यासाठी जीवन हवे की जीवनशैली हे ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जर आपण अजूनही सुधारलो नाही तर येत्या २५ ते ५० वर्षांत निश्चितच मानवजात नष्ट व्हायला सुरुवात होईल, इतके प्रदूषण वाढले आहे आणि जागतिक तापमानवाढ झाली आहे.”
जगण्यासाठी आपल्याला केवळ श्वास आणि पृथ्वीवरील अन्न लागते. भौतिक सुखाच्या मागे लागून तेच जीवन मानल्यामुळे हे सर्व निर्माण झाले आहे. शाश्वत अस्तित्व टिकवण्यासाठी अध्यात्माच्या माध्यमातून श्रद्धा जोपासायला हवी तरच जीवन टिकणार आहे. म्हणूनच पीओपी मूर्तींवर कायम बंदी असली पाहिजे. - गिरीश राऊत, ज्येष्ठ पर्यावरणवादी
पर्यावरण जपायला हवेउंचउंच गणेश मूर्ती साकारण्याच्या नादात पीओपीच्या गणेश मूर्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव आहे. जोपर्यंत गणेश मूर्ती लहान होत्या. तोपर्यंत त्या शाडूच्या मातीच्या तयार करण्यात येत होत्या. मूर्तींचा आकार कमी केल्याने कुठेही श्रद्धाभावात कमतरता येणार नाही, त्यामुळे पीओपी मूर्तींचा आग्रह न धरता नागरिकांनी आता पर्यावरण जपले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी सीमा खोत यांनी व्यक्त केली आहे.