- राज चिंचणकरमुंबई : दादरच्या सैतान चौकी परिसरात ‘जाखादेवी’चे स्थान आहे. सध्या जाखादेवीचे मंदिर जिथे आहे; तिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबीयांनी खोदकाम केले. तेव्हा तिथे त्यांना जाखादेवीची मूळ मूर्ती सापडली. या मूर्तीच्या भोवती सापांचा विळखा होता, असे सांगण्यात येते. जाखादेवीची मूळ मूर्ती मात्र देवीच्या खाली असलेल्या चौथऱ्यात आहे. सैतान चौकीच्या परिसराला या देवीच्या नावावरूनच ‘जाखादेवी’ हे नाव प्राप्त झाले आहे.जाखादेवी ही भंडारी समाजाची कुलस्वामिनी आहे. ही देवी जागृत असल्याने तिला ‘जाखादेवी’ असे संबोधिले जाते. जाखादेवीची मूर्ती संगमरवरापासून घडविली असून, ती द्विभुजा आहे. देवीने एका हातात कमळ व दुसºया हातात त्रिशूळ धारण केले आहे. या देवीसाठी चांदीचा मुखवटाही घडविण्यात आला आहे. जाखादेवीच्या चरणांशी तांदळात ठेवलेल्या नारळावर हा मुखवटा रोवण्यात येतो. देवीला अखंड ६ किंवा ९ वार साडी नेसविली जाते आणि ती मूर्तीला चपखल बसते. ख्रिश्चन व मुस्लीम बांधवही या देवीला नवस बोलतात, हे येथील वैशिष्ट्य! भाविकांना स्वत:च्या हातांनी देवीला ओटी भरता येते. जाखादेवीची मूर्ती चिराबाजार येथील कारागिराकडून घडवून घेतली आहे. मुंबईतील रत्नागिरीकर भाविक दादरला येऊन या देवीची यथासांग पूजा-अर्चा करतात. या मंदिरात एका भिंतीत पूर्वीपासून असलेली दत्ताची मूर्ती देवीच्या गाभाºयात स्थापन केलेली दिसून येते.
दादरची जाखादेवी :भंडारी समाजाची कुलस्वामिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:32 AM