जलधारांनी मुंबई थंडावली
By admin | Published: October 3, 2015 03:15 AM2015-10-03T03:15:53+5:302015-10-03T03:15:53+5:30
अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे कोकणासह मुंबईत शुक्रवारी दमदार सरींनी हजेरी लावली. सकाळी पडलेले ऊन आणि दुपारी दाटून आलेले ढग
मुंबई : अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे कोकणासह मुंबईत शुक्रवारी दमदार सरींनी हजेरी लावली. सकाळी पडलेले ऊन आणि दुपारी दाटून आलेले ढग; अशा दुहेरी वातावरणानंतर सायंकाळी दाखल झालेल्या जलधारांनी तापलेल्या मुंबईला थंडगार केले. तब्बल तीन दिवसांच्या उकाड्यानंतर शुक्रवारी हजेरी लावलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला असून, हा दिलासा पुढील २४ तासांसाठी तरी कायम राहणार आहे.
मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात आले होते. परिणामी, आॅक्टोबर हिटचे मुंबईकरांना चांगलेच चटके बसू लागले होते. शिवाय दिवसा असणारे स्वच्छ आकाश आणि कोरडे वातावरण अशा दुहेरी वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्याचा त्रास जाणवत होता.
शुक्रवारी दुपारी शहर आणि उपनगरात ढग दाटून आले आणि मुंबईसह आसपासच्या प्रदेशात दमदार सरींनी हजेरी लावली. विश्रांतीनंतर का होईना, या पावसाने तासभर तरी सर्वत्र हजेरी लावली. पुढील २४ तासांत मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)ठाणे जिल्ह्यात परतीचा पाऊस
ठाणे : दुपारी कल्याण, अंबरनाथ आदी ग्रामीण आणि शहरी भागांत ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात परतीच्या पावसाने हजेरी लावली. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथमध्ये याचदरम्यान पावसाचा जोर होता. ठाणे शहरात शिंपडलेल्या पावसामुळे रस्ते ओले झाले होते. एक ते दीड तास अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर आदी भागांत पाऊस पडला. तर, ठाणे आणि भिवंडीत रिमझिम पाऊस झाला.
अरबी समुद्रातील वातवरणीय बदलामुळे कोकणासह मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोकणात सातत्याने पाऊस पडत आहे. मुंबईत पुढील
२४ तासांसाठी पावसाचे वातावरण राहील. परतीचा पाऊस अद्याप गुजरातमध्ये असून, तो महाराष्ट्रात दाखल झालेला नाही.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,
मुंबई प्रादेशिक हवामान खाते