मुंबई : कुलाबा येथील मेट्रो हाऊसची आग विझवत असताना अचानक पाणी अपुरे पडू लागले़ वाऱ्यामुळे आग मात्र वाढतच होती़ अशा वेळी पाण्याचे जलखांब (फायर हायड्रंट) दिलासा देऊ शकले असते़ मात्र महानगरातील सिमेंट कॉँक्रिट जंगलात ९० टक्के जलखांब जमिनीखाली गाडले गेले आहेत़गेल्या काही वर्षांपासून आगीच्या प्रत्येक मोठ्या दुर्घटनेवेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते. मात्र पालिकेकडून त्याबाबत काहीच ठोस कार्यवाही केली जात नसल्याने त्याचा मोठा फटका बसत आहे.गुरुवारी कुलाब्यातील मेट्रो इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे फायर हायड्रंटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या दुर्घटनेच्या वेळी तत्काळ पाणी उपलब्ध होण्यासाठी मुंबईत पदपथ व रस्त्यांवर पाण्याचे जलखांब बसविण्यात आले आहेत़ मात्र कालांतराने रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि विविध युटिलिटिजच्या खोदकामांमध्ये असे पाण्याचे जलखांब जमिनीखाली गाडले गेले आहेत़ गुुरुवारी कुलाबा येथे लागलेल्या भीषण आगीवेळी पाणी अपुरे पडू लागले़ त्या वेळी तेथील पाण्याचे जलखांब निकामी असल्याचे आढळून आले़परिणामी अग्निशमन दलास नौदलाची मदत घ्यावी लागली़ मुंबईतील एकूण दहा हजार २२० जलखांबांपैकी दहा टक्के म्हणजे १०४८ जलखांब कार्यक्षम असल्याचे मंत्रालयात लागलेल्या आगीच्या वेळेस समोर आले होते़ कुलाबा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा निकामी जलखांब पुनर्जीवित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे़ (प्रतिनिधी)
काँक्रिटच्या जंगलात गाडले जलखांब
By admin | Published: June 04, 2016 2:59 AM