लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ज्येष्ठ नाट्य अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत (वय ६९) यांचे सोमवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कांदिवली येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. डहाणूकरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका वाहिनीच्या प्रायोगिक नाट्य विभागासाठी परीक्षक म्हणून काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ दिवसांच्या उपचारानंतर ते घरीही परतले होते. त्यानंतर स्मृतिभ्रंशचा आजार जडलेल्या भगत यांच्यावर त्यांचे भाचे डॉ. देवेंद्र राऊत उपचार करीत होते. प्रायोगिक, व्यावसायिक नाटक असा प्रवास करीत असताना भगत यांनी लोककलेचा बाज असलेल्या लोकनाट्यांमध्येही आपली चमक दाखविली. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संशोधक असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी केला.
अजित भगत यांचा अल्पपरिचय
- मुरुड-जंजिऱ्याला जन्मलेल्या भगत यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. पुढील शिक्षण त्यांनी मालाड येथील उत्कर्ष मंदिर हायस्कूलमध्ये घेतले. रुपारेल महाविद्यालयात शिकत असताना त्यांना प्राध्यापक होण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यांचे वडील चिंतामण भगत हे सीमाशुल्क विभागात नोकरीला होते.
- नाट्यकलेची ओढ निर्माण झाल्यावर त्यांनी जयदेव हट्टंगडी, शफाअत खान यांच्याकडून नाट्यतंत्राचे शिक्षण घेतले. अनेक एकांकिकांचे त्यांनी लेखन केले. खून एका अज्ञात इसमाचा या त्यांच्या नाटकाची मोठी चर्चा झाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बोन्साय नाटकाने विविध पारितोषिकांवर नाव कोरले.
- सगे सोयरे, आर्य चाणक्य, स्थापत्यकाराचे मूल, रोम साम्राज्याची पडझड आदी प्रायोगिक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. कशात काय लफड्यात पाय, चूप गुपचूप, बुवा भोळा अशा सत्यदेव दुबेंच्या प्रायोगिक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. जय जय रघुवीर समर्थ, खंडोबाचे लगीन, जांभूळ अख्यान, तिसरी घंटा अशा विविध नाटकांमधून त्यांनी आपल्या कलेचे दर्शन घडवले.