राज चिंचणकर , मुंबईज्येष्ठ नाटककार सुरेश चिखले यांच्या लेखणीतून उतरलेले आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी अखिल महाराष्ट्रात गाजवलेले, ‘जांभूळ आख्यान’ हे लोकनाट्य मराठी व्यावसायिक रंगभूमीवर या पुढेही सुरू राहणार आहे. विठ्ठल उमप यांचे पुत्र नंदेश उमप यांनी याबाबत सांगितले की, ‘विठ्ठल उमप आणि सुरेश चिखले यांची ही अजोड कलाकृती चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन रंगकर्मींच्या पश्चातही त्यांच्या स्मृती रंगभूमीवर कायम दरवळत राहणार आहेत.’ सुरेश चिखले यांच्या प्रथम स्मृतिदिनी डिंपल पब्लिकेशनने आयोजित केलेल्या सभेत, नंदेश उमप यांनी ही घोषणा करत तमाम लोकनाट्य कलावंतांना दिलासा दिला आहे. १९९०, २००५ आणि २०१२ अशा तीन टप्प्यांत हे नाटक रंगभूमीवर आले आणि या कलाकृतीने लोकनाट्याचा साचा बदलून टाकला. सुरेश चिखले यांची सिद्धहस्त लेखणी आणि विठ्ठल उमप यांचे रंगमंचीय सादरीकरण या संगमातून हे लोकनाट्य अजरामर झाले. २००५ मध्ये तर लोकशाहिरांनी त्यांच्या घरचे दागिने व गाडी गहाण ठेऊन या नाट्याचे प्रयोग केले. त्यानंतर, २०१२ चा टप्पाही त्यांनी ओलांडला. त्यांच्या निधनानंतर हे लोकनाट्य त्यांच्या पुढच्या पिढीने हाती घेतले आणि २०१२ ते आजतागायत या नाट्याचे ११० प्रयोग त्यांनी केले आहेत. कितीही अडचणी आल्या, तरी हे नाटक कायम सुरू ठेवण्याचा निर्धार नंदेश उमप आणि त्यांच्या परिवाराने केला आहे.
‘जांभूळ आख्यान’ सुरूच राहणार...!
By admin | Published: September 14, 2016 4:56 AM