ठाणे : पदपथाखालील गटारात पडून मृत झालेल्या जमिला खानच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या संबंधितांवर कारवाई करावी, तिच्या घरातील एका सदस्याला महापालिकेतील सेवेत सामावून घ्यावे तसेच तिच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी राबोडीतील रहिवासी आणि तिच्या कुटुंबीयांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचेआदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील पदपथ अचानक खचल्याने त्याखालील १५ फूट खोल गटारात पडून जमिला खान यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आता उमटू लागले असून संतप्त रहिवाशांनी तिच्या कुटुंबीयांसमवेत पालिकेवर धडक दिली. सुरुवातीला त्यांना मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडविण्यात आल्याने त्यांचा राग अनावर झाला. त्यानंतर, विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी मध्यस्थी करून तिच्या नातेवाइकांसह काही रहिवाशांची आयुक्तांबरोबर भेट घडवून दिली. दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा इशारा स्थानिकांनी दिला होता. आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगून या चौकशीतून जी माहिती पुढे येईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांना दिले. त्यानंतर, रहिवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले. जमिला खान हिच्या मृत्यूप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी तसेच गटाराचे काम केलेला कंत्राटदार, अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच स्थानिक नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक नेमके कोण?, याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी या कामासंबंधीची सविस्तर माहिती सोमवारी महापालिकेकडे मागितली आहे.
जमिला खानचे संतप्त कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पालिकेत
By admin | Published: February 09, 2016 2:13 AM