मुंबई : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास अद्याप आठवडाभराचा अवधी असला तरी महापालिका प्रशासनाने नगरसेवकांना दिलेले मोबाइल फोन बंद केले आहेत. त्यांचा हा नंबर ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जनसंपर्क तुटण्याच्या भीतीने नगरसेवक हादरून गेले आहेत. त्यामुळे पालिकेने दिलेले सीम कार्ड परत मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.पालिकेच्या विविध समित्या तसेच सभागृहाचा अजेंडा तसेच पालिकेच्या अॅपची सुविधा नगरसेवकांना आपल्या मोबाइलवर बघता यावी, यासाठी नगरसेवकांना मोबाइल देण्यात आले. त्यासाठी त्यांना दर महिन्याला १२५ रुपयांचा इंटरनेट पॅकही देण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारी ऐकणे, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी बहुतांश नगरसेवक हाच क्रमांक वापरीत होते. मात्र महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने हे सीमकार्ड बंद करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार २४ डिसेंबरपासून या मोबाइलची सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे गैरसोय होऊ लागल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे ते सीम कार्ड स्वत:च्या नावे करायचे असल्यास थेट व्होडाफोन कंपनीकडे अर्ज करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. त्यासाठी महापालिकेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवकांच्या मोबाइलला ‘जॅमर’
By admin | Published: December 29, 2016 2:21 AM